मध्यवर्ती कारागृहातून कोरोना झाला हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:37+5:302021-06-26T04:10:37+5:30
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातून कोरोना हद्दपार झाला आहे. आजमितीला एकही बंदीजन संक्रमित नसल्याची नोंद करण्यात आली आहे. ...
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातून कोरोना हद्दपार झाला आहे. आजमितीला एकही बंदीजन संक्रमित नसल्याची नोंद करण्यात आली आहे. हल्ली कारागृहात ११५६ बंदीजन असून, यात २२ महिला कैदी आहेत. शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून नवीन कैद्यांना १४ दिवस क्वारंटाईन अनिवार्य केल्यामुळेच कारागृह कोरोनामुक्त झाले आहे.
कोरोना संसर्ग कमी होत असल्याने शासनाने ‘अनलॉक’केले. मात्र, कारागृहातील कैदी ‘लाॅक’ आहेत. गत आठवड्यापासून कारागृहात एकही बंदीजन संक्रमित आढळून आलेला नाही.
होमगार्डच्या विभागीय कार्यालयात आयसोलेटेड कैदी सुद्धा नाहीत. मध्यवर्ती कारागृहात महिला व पुरुष असे ११५६ च्यावर कैदी जेरबंद आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कारागृहातील ६८ कैदी व कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते. मात्र, यंदा फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली असताना कारागृहात कोरोना नियंत्रणात आणला आहे. कैद्यांची नियमित आरोग्य तपासणी, मास्कचा वापर, शारीरिक सुरक्षित अंतर आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत एक कर्मचारी व एक कैदी बळी ठरले आहे. त्यानंतर कारागृहात कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. नियमित आरोग्य तपासणीदरम्यान ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण आढळल्यास औषधोपचार केला जातो. होमगार्ड कार्यालयात साकारलेल्या कोविड केअर केंद्रात संक्रमित कैद्यांवर उपचार होत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी मिलिंद गवई यांनी दिली.
------------------
आताही नव्या कैद्यांसाठी १४ दिवस क्वारंटाईन नियमावली
न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात पाठविल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन कैद्यांना तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस क्वारंटाईन नियमावली अनिवार्य आहे. त्यामुळे थेट कारागृहात नवीन कैद्यांची कोरोना चाचणी झाल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. तसेच नियमित आरोग्य तपासणीमुळे सुद्धा कैदी कोरोना संसर्गापासून लांब राहत असल्याचे वास्तव आहे.
---------------
आजमितीला एकही कैदी कोरोना संक्रमित नाही. कारागृहात ११५६ बंदीजन असताना प्रत्येकाची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ११ महिला क्वारंटाईन असून ११ महिला कैदी नियमित आहेत. कोरोना संक्रमित कैदी नसल्याने दिलासा आहे.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती