गुन्हेगारी हात साकारताहेत गणराया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:51+5:302021-07-25T04:12:51+5:30
(फोटो आहेत) अमरावती : पाषाण भिंतीच्या आत गजाआड न्यायालयाच्या आदेशानुसार विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले कैदी कौशल्याच्या आधारे ...
(फोटो आहेत)
अमरावती : पाषाण भिंतीच्या आत गजाआड न्यायालयाच्या आदेशानुसार विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले कैदी कौशल्याच्या आधारे सुबक गणरायाच्या मूर्ती साकारत आहेत. पारंपरिक मूर्तिकारांच्या कलाकुसरीला मागे टाकतील अशा सुबक गणेशमूर्ती येथील मध्यवर्ती कारागृहातील कैदी साकारत आहेत.
कारागृहात सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत बंदीजनांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. बंदीजनांमध्ये असलेल्या कौशल्याच्या आधारे त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिले जाते. परंतु, काही बंदीजन मुळातच चित्रकार, कलावंत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासन अशा कैदी बांधवाच्या हातून दरवर्षी सण, उत्सवाच्या काळात मूर्ती तयार करून त्या विकतात आणि रोजगार उपलब्ध करून देतात. अशाच प्रकारे यंदाही १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी हा उत्सव साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने कैदी बांधवांच्या हातून गणरायाच्या मूर्ती साकारली जात आहे. गणेश मूर्तीसाठी लागणारे साहित्य कारागृह प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गणरायाच्या मूर्ती साकारण्यासाठी ८ ते १० कैदी बांधव श्रम घेत आहेत. अतिशय सुबक आणि आर्कषक गणेशमूर्ती साकारल्या जात आहे. यात घरगुती मूर्ती तयार करण्यात येत आहे.
------------------
कारागृहाच्या मॉलमध्ये होणार विक्री
कैदी बांधवांनी साकारलेल्या गणरायाच्या मूर्ती मध्यवर्ती कारागृहाच्या वस्तू, साहित्य विक्री मॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे. बाजारपेठेपेक्षा स्वस्त दरात गणरायाच्या मूर्ती विकल्या जातील, असे नियोजन करण्यात येणार आहे. शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याकडे अधिक भर दिला जात आहे. २०० ते एक हजार रुपयांपर्यंत गणरायाच्या मूर्तीची किंमत असणार आहे.
----------------
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाच्या मूर्ती कैदी साकारत आहेत. काही कैदी मुळात कलावंत असून, त्यांच्या हातून साकारलेल्या मूर्ती अतिशय सुबक, देखण्या असतात. आपसूकच गणेश भक्त त्या खरेदीला प्राधान्य देतात. यंदा कारागृहाच्या मॉलमध्ये विक्री करण्यात येतील.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.