अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेत या विषयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत दोन वर्षांचा पीजी (पदव्युत्तर) अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
महापुरुष, थोर नेते, समाजसुधारकांचे विचार नव्या पिढीला ज्ञात व्हावे, त्यांचे कार्य, विचाराने देशाची उभारणी व्हावी, यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत अधिष्ठाता मंडळाने संमती दर्शविली होती. या अभ्यासक्रमाचे समाजात महत्त्व आणि उपयोगिता जाणून घेण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष मानव विद्या शाखेचे अधिष्ठाता अविनाश मोहरील हाेते. डॉ. यू.आर. जाने, डॉ. संतोष बनसोड, डॉ. जी.एल. गुल्हाने, विकास विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखडे हे समितीत होते. या समितीने सर्वांगिण विचारविमर्श, इतिहासतज्ज आणि जाणकारांशी मंथन केले. हा अभ्यासक्रम दोन वर्षे, अल्पकालीन किंवा ऐच्छिक विषय पदवी, पदव्युत्तर ठेवता येईल, असा योग्यतेचा असल्याचे मत समितीने नोंदविले होते. तसेच हा अभ्यासक्रम मूल्य, रोजगाराचा भाग, करिअर आदी स्थितीवरही उपयाेगी ठरेल, असा अभिप्राय समितीने नोंदवून पुढील मान्यतेसाठी विद्या परिषदेकडे पाठविला होता. अधिष्ठाता मंडळाच्या शिफारशीनुसार हा अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्या परिषदेने मान्यता प्रदान केली आहे.
-------------------
अमोल निस्ताने यांची मरणोपरांत मागणी मंजूर
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करावा, यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख द्धिंवगत अमोल निस्ताने यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना निवेदन सादर केले होते. दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये अमोल निस्ताने यांचे निधन झाले, मात्र, विद्यापीठाने निस्ताने यांच्या मागणीची दखल घेत शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्रदान केली आहे.
-----------------------
येत्या २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर आधारित दोन वर्षीय पीजी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत तो चालविला जाईल.
- अविनाश मोहरील, अधिष्ठाता, मानव विज्ञान शाखा.