: राजापेठ येथील प्रकरण
अमरावती : ‘सुसाईड नोट’मध्ये नावाचा उल्लेख असल्याने गुन्हा होत नाही. सोबत प्रत्यक्ष सहभाग असणे आवशक्य आहे, असा निर्णय नागपूर उच्च न्यायालयाने दिला आहे. सासऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी डॉक्टर असलेल्या सूनेविरुद्ध पोलिसांनी नोंदविला. नोंदविलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने २ डिसेंबर रोजी दिला.
मृत भगवानजी निचत हे राजापेठ येथे त्यांच्या मुलासोबत वरच्या मजल्यावर राहत होते. खाली हॉस्पिटल असल्याने तेथे कोरोनाचे रूग्णसुद्धा येेत होते. वृद्ध आई-वडिलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्यांना खाली जाण्यास घरातील व्यक्ती मनाई करीत असे. याच गोष्टीचा मृत वृद्धाला राग येत होता. याच कारणामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडून ते ६ ऑक्टोबर २०२० रोजी घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यांनी मृत्युपुर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत घरातील सूनेचे व इतर काही सदस्यांची नावे लिहिली आहे. यावरून राजापेठ पोलिसांनी भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदवून चौकशी आरंभली. या गुन्ह्याच्याविरुद्ध नागपुर उच्च न्यायालयात डॉक्टर सुनेने याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या बाजूने अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनेवर नोंदविलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या निकालानुसार आत्महत्येस प्रवृत्त गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीचा आत्महत्येत प्रत्यक्ष सहभाग, आत्महत्येसाठी प्रोत्साहन देणे किंवा तशी कृती करणे आवश्यक असल्याचा अभिप्राय उच्च न्यायालयाने दिला आहे.