अमरावती : नालीच्या छपाईला पाणी देण्यासाठी मोटरला घेतलेल्या अवैध वीजपुरवठ्यातून जिवंत वीज प्रवाहाचा संचार होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. चौकशीत हे स्पष्ट झाल्याने खोलापूरी गेट पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी ठेकेदारासह दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला.
अनूप प्रकाश साहू (३७, रा. शारदानगर) व पंकज शिवराम पवार (५५, रा. शीतल कॉलनी, वडरपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. ७ जून रोजी नालीचे बांधकाम करताना मजूर अर्जुन जांबेकर (३५, रा. मोरगढ, ता. चिखलदरा) याचा मोटरमधील वीज प्रवाहाने मृत्यू झाला. याप्रकरणात खोलापुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. याप्रकरणी चौकशी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या बयाणानंतर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच अर्जुनचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. पार्वतीनगर ते भातकुली नाका रोडवरील केशव विहारात नाली छपाईचे काम सुरू होते. ठेकेदाराने या बांधकामाला पाणी देण्यासाठी थेट खांबावरून वीज घेतली होती. ले-आऊट मालक व ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने मजुराचा मृत्यू झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. सुदाम जांबेकर याच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवरही गुन्हा नोंदविला. पुढील तपास खोलापुरी गेट पोलीस करीत आहेत.