अमरावती : सात दिवसांपूर्वी राहत्या घरी मृतावस्थेत आढळलेल्या प्रियंका दिवाण हिची हत्या करण्यात आल्याचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री ९ च्या सुमारास मृताचा पती डॉ. पंकज दिवाण, त्यांची आई व बहिणीविरुद्ध खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे, शारीरिक व मानसिक छळ करणे व फाैजदारी स्वरूपाचा कट रचल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीएम रिपोर्ट व मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
प्रियंका पंकज दिवाण (वय २७) यांचा मृतदेह त्यांचे पती डॉ. पंकज दिवाण यांच्या राधानगरस्थित श्री साई हेल्थकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलवजा घरामध्ये २० एप्रिल रोजी सकाळी आढळून आला होता. आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा दावा डॉ. दिवाण यांनी केला होता. दुसरीकडे आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, डॉक्टर पतीनेच तिचा घातपात घडवून आणल्याचा आरोप प्रियंकाच्या वडिलांनी केला होता. त्यामुळे प्रियंकाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात न करता ती अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. तो शवविच्छेदन अहवाल बुधवारी पोलिसांना प्राप्त झाला.
हेड इंज्युरीसह जीव गुदमरल्याने प्रियंकाचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद आहे. त्या अनुषंगाने मृताच्या बहिणीचा रिपोर्टदेखील घेण्यात आला. आपल्या बहिणीचा डॉक्टर पती, तिची सासू व नणंदेने छळ केला तथा कट रचून तिचा खून केला. पुढे तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केल्याचे मृताच्या लहान बहिणीने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी डॉक्टर पंकज दिवाण घटनेच्या दिवसांपासून फरार असून, अटकेसाठी पथके पाठविण्यात आल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.