अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन सीईओंसह ११ जणांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:07+5:302021-06-16T04:17:07+5:30
----------------------------------------------------------------------------- खासगी कंपनीतील गुंतवणुकीपोटी ३.३९ कोटींची दलाली : सहकार क्षेत्रात खळबळ अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एका खासगी ...
-----------------------------------------------------------------------------
खासगी कंपनीतील गुंतवणुकीपोटी ३.३९ कोटींची दलाली : सहकार क्षेत्रात खळबळ
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एका खासगी कंपनीत तब्बल ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. कंपनी आणि बँकेचा थेट व्यवहार असताना शेतकऱ्यांच्या ठेवीला चुना लावत संबंधितांना तब्बल ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्यात आल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले होते. याप्रकरणी सोमवारी जिल्हा उपनिबंधकांच्या तक्रारीवरून बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, चार कर्मचारी व शेअर मार्केटशी संबंधित सहा अशा एकूण ११ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. सबब, सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१३ ते २०१९ या काळात निप्पोन कंपनीच्या म्युच्युअल फंडमध्ये तब्बल ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीच्या व्यवहारातून बँकेला सुमारे २६८ कोटी रुपये फायदा झाला असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असताना, ३ कोटी ३९ लाखांची दलाली कुणाच्या घशात गेली, थेट व्यवहार व संपर्क असताना दलाली कशासाठी, हा प्रश्न पोलीस चौकशीत उपस्थित झाला आहे.
कोतवाली पोलिसांकडे या प्रकरणात सुमारे दोन महिन्यांपूर्वी १५ शेतकऱ्यांनी तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगानेच पोलिसांनी बँकेचे प्रशासक सतीश भोसले यांना सखोल माहिती मागवली होती. त्यामुळे भोसले यांनी बँकेचे ऑडिट करून घेतले. या ऑडिटमधूनच ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली गेल्याचा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे प्रकरण आर्थिक अफरातफरीशी संबंधित असल्याने पुढील तपासासाठी ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.
ही तर बँकेची, ठेवीदारांची फसवणूक
वास्तविक, गुंतवणूक करणारी बँक आणि गुंतवणुकीसाठी रक्कम घेणारी कंपनी एकमेकांसोबत थेट व्यवहार करीत असताना दलाली देण्यात आली. ही दलाली दिली नसती, तर ही ३ कोटी ३९ लाख रुपयांची रक्कमसुद्धा बँकेलाच मिळाली असती. पर्यायाने दलालीमध्ये गेलेली ही रक्कम म्हणजे बँकेचे नुकसान असल्याच्या निष्कर्ष पोलीस तपासातून निघाला आहे.
हे आहेत गुन्हा दाखल झालेले आरोपी
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे.सी. राठोड, कर्मचारी निळकंठ बी. जगताप, सुधीर ब. चांदूरकर, राजेंद्र गणेश कडू, रोहिणी सुभाष चौधरी यांच्यासह शेअर व म्युचुअल फंडचे दलाल अजितपाल हरिसिंग मोंगा, नीता राजेंद्र गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, शोभा मधुसूदन शर्मा, शिवकुमार गोकुलदास गट्टाणी व राजेंद्र मोतीलाल गांधी यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कोट
जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह एकूण ११ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला. तपासाला वेग दिला आहे.
- राहुल आठवले, ठाणेदार, शहर कोतवाली
--------------