आॅनलाईन लोकमतअमरावती : कारागृह प्रशासनाने बंदीजनांना सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती दूर व्हावी, यासाठी नानाविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने दोन वर्षांपूर्वी २० बंदीजनांना एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आता हेच बंदीजन एलईडी ट्यूबलाइट तयार करीत असून, ते राज्यातील अन्य कारागृहांना प्रकाशमय करतील.अमरावती मध्यवर्ती कारागृह हे एलईडी दिवे, पथदिवे तयार करणारे पहिले कारागृह ठरले आहे. येथे तयार होणारे एलईडी दिवे अन्य कारागृहांमध्ये पाठविले जातात. एलईडी ट्यूबलाइट तयार करण्याला प्रत्यक्ष शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला आहे. वर्धा येथील एमगिरी येथील तज्ज्ञांनी बंदीजनांना एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. कारागृहाच्या विद्युत विभागात एलईडी ट्यूबलाइट तयार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केले आहे. कारागृहात बंदीजनांची सूर्योदय ते सूर्यास्त अशा दिनचर्येत एलईडी ट्यूबलाइट तयार केले जात आहेत. यातून बंदीजनांना रोजगारदेखील उपलब्ध होत आहे. अतिशय अशा कौशल्यपूर्ण कलाकुसरीने बंदीजन एलईडी ट्यूबलाइट साकारत आहेत. बंदीजनांनी तयार केलेल्या एलईडी ट्यूबलाइटच्या प्रकाशाने येथील कारागृहाचा परिसर प्रकाशमय झाला आहे.एलईडी दिवे वापराने वीज बचत होऊन विकासात हातभार लावण्याचे काम कारागृह प्रशासन करीत आहे. एलईडी ट्यूबलाइटची किंमत ४५० रुपये एवढी आकारण्यात आली असून, उत्तम दर्जा, साहित्याने तयार करण्यात आले आहे.कारागृहात यापूर्वी एलईडी दिवे, पथदिवे तयार करण्यात आले. परंतु पहिल्यांदाच एलईडी ट्यूबलाइट बनविण्यात आले आहे. याकरिता २० बंदीजनांचे कौशल्य पणाला लागले आहे. या उपक्रमाची वरिष्ठांनी दखल घेतली असून, अन्य कारागृहाच्या मागणीनुसार पुरवठा केला जाईल.- रमेश कांबळेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह
गुन्हेगारी हाताला कौशल्याची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:54 PM
कारागृह प्रशासनाने बंदीजनांना सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती दूर व्हावी, यासाठी नानाविध उपक्रम सुरू केले आहेत.
ठळक मुद्देबंदीजन तयार करताहेत एलईडी ट्यूबलाइट : कारागृहांना करणार प्रकाशमय