मुलींना चॉकलेट गिफ्ट करणे रोडरोमिओंना पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:18 PM2018-06-30T22:18:36+5:302018-06-30T22:18:59+5:30
अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून चॉकलेट गिफ्ट करणाऱ्या तीन रोडरोमिओंना शनिवारी सकाळी पोलिसांनी मालटेकडीजवळ पकडले. तक्रार देण्यास कोणीही पुढे न आल्याने फे्रजरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध प्रतिबंधत्माक कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून चॉकलेट गिफ्ट करणाऱ्या तीन रोडरोमिओंना शनिवारी सकाळी पोलिसांनी मालटेकडीजवळ पकडले. तक्रार देण्यास कोणीही पुढे न आल्याने फे्रजरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध प्रतिबंधत्माक कारवाई केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, मोहन आनंद माने (रा. लोकमान्य चौक, वलगाव), पवन विष्णू बगल्ले (१९) व नागेश दिपक पंडीत (१९ दोन्ही रा. समतानगर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणाºया तीन अल्पवयीन मुली शाळा सुटल्यानंतर वलगावला घरी जाण्यासाठी बसस्थानकाकडे निघाल्या. तीन तरुण पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तेथून एक मुलगी निघून गेली, तर दोन मुली मालटेकडी रोडने निघाल्या. शाळेतील मुलींचा पाठलाग होत असल्याचे शिक्षिका माधवी पवार यांच्याही लक्षात आले. त्यांनी काही शिक्षकांना घेऊन मालटेकडी गाठली. त्याच्या पायथ्याशी हे तिघे मुलींच्या हातात चॉकलेट देत असल्याचे दिसले. त्याचवेळी पवार यांनी दामिनी पथकाची मदत घेतली. पोलिसांनी मुलांना फे्रजरपुरा ठाण्यात आणले. संबंधित मुलगी घरी निघून गेल्याने तिच्या मैत्रिणींना गाठल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत तक्रार देण्याची सूचना पोलिसांनी शाळेतील शिक्षकांना केली. मात्र, हा गंभीर प्रकार घडल्यानंतरही शिक्षकांनी पोलीस तक्रार दिली नाही. खरे तर शिक्षकांनी स्वत:हून ही तक्रार करायला हवी होती; मात्र त्यांनी या प्रकरणाकडे विशेष गांभीर्याने बघितले नाही.
वाद उफाळण्याची दाखविली पोलिसांना भीती
पोलिसांनी मुलांना पकडल्यानंतर राजकीय पक्षाचे दोन पदाधिकारी ठाण्यात दाखल झाले. मुलांवर कारवाई करू नका; वलगावात वाद उफाळून येऊ शकतात, असा दमच त्यांनी दिला. मात्र, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी चोख कर्तव्य बजावीत या मुलांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.