वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील विविध जलाशयांवर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या मुक्त विहाराला व एकंदर परिसंस्थेलाच धोका निर्माण झालेला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. शिकारीही पाळत ठेवून शिकार घडवून आणत असल्याचे पक्षिनिरीक्षकांच्या निरीक्षणातून उघड झाले आहे.अमरावती जिल्ह्यात छोटे-मोठे असे ३२ जलाशय असून, त्याच्या अवतीभोवती पक्ष्यांचे आगमन होत असते. तहान भागविण्यासाठी तसेच विणीच्या हंगामात पक्षी येथे वास्तव्य करतात. हे पक्षी अनेकदा मासेमारांच्या जाळ्यात अडकतात. मासेमार अडकलेल्या पक्ष्यांना सोडविण्याऐवजी बहुतांश वेळी खाद्य बनवितात. त्यामुळेच दिवसेंदिवस त्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी पक्षिअभ्यासक निनाद अभंग यांनी मोर्शीतील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावर पक्षिनिरीक्षण केले. संपूर्ण प्रकल्प फिरून झाल्यावर ते मत्स्यबीज केंद्रात गेले. तेव्हा धक्कादायक बाब पुढे आली. तेथे त्यांना कॉमन पोचार्ड (लालसरी) पक्षी बंदिस्त आढळला. संबंधितास विचारले असता, तो पक्षी जाळ्यात अडकल्याने घरी आणल्याचे सांगण्यात आले. त्यांंनी मत्सबीज केंद्राच्या संचालकांना माहिती देऊन पक्षी संवर्धनाविषयी जागरूक केले. फेरफटक्यादरम्यान ठिकठिकाणी पक्षी पकडण्यासाठी पिंजरे आणि जाळ्या लावलेल्या दिसल्या. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी पक्षी मारून खाल्ल्याच्या खुणा होत्या. यावरून संभाव्य धोका लक्षात घेऊन वनविभागासह वन्यप्रेमींनी गंभीरतेने पावले उचलल्यास वन्यजीव संवर्धनास मोठी मदत मिळेल.यापूर्वीही घडल्या अशा घटनाकाही दिवसांपूर्वी कॉमन पोचार्ड हा पक्षी सावंगा येथील तलावावर जाळ्यात अडकलेला आढळून आला होता. त्याला निनाद अभंग आणि शिशिर शेंडोकार यांनी जाळ्यातून सोडविले होते. तत्पूर्वी किरण मोरे यांनीही कॉमन पोचार्डला जाळ्यातून सोडविले.लुप्त होणारी प्रजातीविकिपीडिया आणि काही पक्षी तज्ञांच्या माहितीवरून कॉमन पोचार्ड हा पक्षी लुप्त होणाºया प्रजातीच्या यादीत आहे. कॉमन पोचार्ड हा युरोपीय खंडातून आशियाखंडात पाहुणा म्हणून येतो. येथे येऊन जीवनयात्रा सुरू करण्यापूर्वी त्याला गतप्राण व्हावे लागत असल्याची खंत पक्षीप्रेमींनी व्यक्त केली.स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या सुरक्षिततेकडे निसर्गमित्रांनी लक्ष दिल्यास या मुक्या पक्ष्यांना वाचविता येऊ शकते.- निनाद अभंग, पक्षिअभ्यासकजिल्ह्यातील काही तलाव वनविभागाच्या अखत्यारीत आहेत. तेथे गावागावांत जैवविविधता संवर्धन समिती स्थापन करून जनजागृती होणे अपेक्षित आहे.- गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक
तलावावर मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 9:50 PM
जिल्ह्यातील विविध जलाशयांवर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या मुक्त विहाराला व एकंदर परिसंस्थेलाच धोका निर्माण झालेला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून पक्षी मृत्युमुखी पडत आहेत.
ठळक मुद्देपक्षिनिरीक्षकांचे निरीक्षण : मच्छिमारांचे जाळे, शिकाऱ्यांनी केले लक्ष्य; जनजागृतीची आवश्यकता