आदिवासी मुलीचे मृत्यूप्रकरण : म्हसोना आश्रमशाळेतील दोन्ही अधीक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:56 PM2019-02-20T15:56:51+5:302019-02-20T15:57:39+5:30

अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील आश्रमशाळेत झालेल्या आदिवासी मुलींच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समितीने महिला व पुरुष असलेल्या दोन्हीही अधीक्षकांना निलंबित केले.

Death of tribal girl: Suspension of two the Superintendents of Mhasona Ashramshala | आदिवासी मुलीचे मृत्यूप्रकरण : म्हसोना आश्रमशाळेतील दोन्ही अधीक्षक निलंबित

आदिवासी मुलीचे मृत्यूप्रकरण : म्हसोना आश्रमशाळेतील दोन्ही अधीक्षक निलंबित

Next

अमरावती - अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील आश्रमशाळेत झालेल्या आदिवासी मुलींच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समितीने महिला व पुरुष असलेल्या दोन्हीही अधीक्षकांना निलंबित केले. अजूनही कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 

आदिवासी विभागामार्फत अनुदानतत्त्वावर चालविण्यात येणा-या म्हसोना येथील श्रीगुरुदेव अनुदानित आश्रमशाळेच्या सोनल लक्ष्मणराव दांदळे यांना वसतिगृहात गैरहजरीवरून, तर कामात अनियमिततेचा ठपका ठेवत घनश्याम पुरुषोत्तम मालू या दोन्ही अधीक्षकांना बुधवारी सकाळी ११ वाजता नेमलेल्या चौकशी समितीने चौकशीअंती निलंबित केले. यात अजूनही कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.

आश्रमशाळेतील इयत्ता सातवीमध्ये शिकणारी गौरी मुन्ना जामूनकर (१४, रा. रेहट्याखेडा, ता. चिखलदरा) या विद्यार्थिनीचा अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी पहाटे पावणेपाच वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी वसतिगृहात पोटदुखी व ओकारीमुळे प्रकृती खालावल्याने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. यानंतर तिला अमरावतीला पाठविण्यात आले होते. तेथे तिचा मृत्यू झाला. 

सदर संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याची मागणी गौरीच्या वडिलांसह आदिवासी संघटनांनी केली होती. तशी तक्रार परतवाडा पोलिसांतसुद्धा देण्यात आली. यामुळे संस्थेच्यावतीने सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. तेलखार येथील शाळेचे मुख्याध्यापक संजय सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली धनराज लबडे, विनोद घुलक्षे, सुनीता वानखडे, ज.स. मार्के, एन.बी. कासदेकर आदींनी दोन दिवसांपासून प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये अधीक्षक सोनल दांदळे व घनश्याम मालू दोषी आढळल्याने त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रकरणाची चौकशी सुरू ठेवणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

प्रकल्प अधिका-यांकडून चौकशी, पोलिसांत तक्रार
विद्यार्थिनीच्या मृत्यूची चौकशी खुद्द धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. त्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाईचे तसेच चौकशीतील शिक्षण विस्तार अधिकारी अशोक धर्माळे यांना पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिले. 

पोलीस चौकशी सुरू
मृत गौरीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून परतवाडा पोलिसांनी पूर्वीच चौकशी आरंभली आहे. प्रयोगशाळेचा अहवालसुद्धा बोलावण्यात आला आहे. सर्व संशयास्पद बाजूंची चौकशी सुरू असल्याचे चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक केशव ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले

म्हसोना आश्रमशाळेतील मृत्यूप्रकरणी मी स्वत: चौकशी केली. संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांतसुद्धा विस्तार अधिकाºयामार्फत तक्रार देण्यात आली आहे.
- राहुल कर्डिले, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी

श्रीगुरुदेव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समितीने चौकशी केल्यावर दोन्ही अधीक्षकांना निलंबित केले आहे. 
- संजय सातपुते, अध्यक्ष, चौकशी समिती

Web Title: Death of tribal girl: Suspension of two the Superintendents of Mhasona Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.