चार लाख लसींची मागणी अन् मिळाल्या १२९००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:14 AM2021-04-23T04:14:45+5:302021-04-23T04:14:45+5:30
अमरावती : कोरोना संक्रमणाची आकडेवारी बघता अमरावती जिल्ह्यासाठी तब्बल चार लाख लसींची मागणी आराेग्य यंत्रणेकडे करण्यात आली होती. मात्र, ...
अमरावती : कोरोना संक्रमणाची आकडेवारी बघता अमरावती जिल्ह्यासाठी तब्बल चार लाख लसींची मागणी आराेग्य यंत्रणेकडे करण्यात आली होती. मात्र, बुधवारी केवळ १२ हजार ९०० कोविशिल्ड लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ‘ऊंट के मुंह में जीरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृत्युसंख्या बघता सुरक्षिततेसाठी लस टोचून घेण्याकडे कल वाढला आहे. मात्र, राज्य शासनाकडे लसींची मागणी केली असताना ती अल्प प्रमाणात मिळत असल्याचे वास्तव आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. गुरुवारी जिल्ह्यातील १३५ लसी केंद्रावर कोविशिल्डचा पुरवठा करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींची लसीसाठी मागणी बघता जिल्हा आरोग्य विभागाने अकोला येथील आरोग्य सहसंचालकांकडे चार लसींची ऑनलाईन मागणी केली होती. तीन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर केवळ १२,९०० लसी प्राप्त झाल्या आहेत. गुरुवारी बहुतांश केंद्रांवर लसीकरणासाठी रांगा दिसून आल्या. विशेषत: लस टोचून घेण्यासाठी ज्येष्ठांची गर्दी वाढत आहे. शासन, प्रशासनाने लस उपलब्ध करून द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अमरावती महापालिका क्षेत्र, १४ तालुके आणि खासगी दवाखान्यात लसी वाटपांचे नियोजन करताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. गुरुवार, शुक्रवार असे दोन दिवस ही लस पुरणार असून, पुन्हा लसीकरण केंद्रात ठणठणाट राहणार आहे.
--------------------
असे केले लसींचे वाटप
अमरावती महापालिका : ३०००
खासगी दवाखाने : २०००
अमरावती तालुका : ६००
भातकुली : ६००
चांदूर बाजार: ६००
चांदूर रेल्वे : ६००
धामणगाव रेल्वे :८००
दर्यापूर : ५००
अंजनगाव सूर्जी : ५००
अचलपूर: १०००
तिवसा :६००
चिखलदरा: ३००
धारणी : ३००
वरूड: ५००
मोर्शी : ६००
------------------
राज्य शासनाकडून अमरावती जिल्ह्यासाठी मंगळवारी उशिरा १२ हजार ९०० लसी प्राप्त झाल्या आहेत. या लसी दोन दिवस पुरेल एवढ्याच क्षमतेच्या आहे. मागणीनुसार लसी अल्प मिळाल्या आहेत. गुरूवारी सकाळीच लस केंद्रावर पाठविण्यात आल्या आहेत.
- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी