‘एडीफाय’ मुख्याध्यापकाचा ‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार
By Admin | Published: August 17, 2016 11:56 PM2016-08-17T23:56:57+5:302016-08-17T23:56:57+5:30
राष्ट्रगीत आटोपल्यानंतर 'भारत माता की जय' न म्हणण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती करणाऱ्या आणि तसा आग्रह धरणाऱ्या...
शिक्षिकेने घेतला आक्षेप : विहिंपची पोलीस ठाण्यात तक्रार
अमरावती : राष्ट्रगीत आटोपल्यानंतर 'भारत माता की जय' न म्हणण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती करणाऱ्या आणि तसा आग्रह धरणाऱ्या शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या एडीफाय शाळेच्या मुख्याधापकाविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसांनी चौकशी आरंभली आहे.
कठोरामार्गावर एडीफाय स्कूल आहे. शाळेतील विद्यार्थी राष्ट्रगीतानंतर 'भारत माता की जय' घोषणा देत नसल्याचे एका शिक्षिकेच्या लक्षात आले. हा राष्ट्रगीताचा अवमान असल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तीन दिवस उलटूनही शिक्षिकेला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी १० आॅगस्ट रोजी शाळेत राष्ट्रगीत झाल्यानंतर ‘भारत माता की जय’ ही घोषणा दिली. त्यावर मुख्याध्यापकाने शिक्षिकेलाच खडसावून शाळेतून बाहेर फेकून देण्याची धमकी दिल्याचा शिक्षिकेचा आरोप आहे. शिक्षिकेने दिलेल्या माहितीवरून १२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शाळेत राष्ट्रगीत सुरू असताना विश्व हिंदू परिषदेचे काही पदाधिकारी शाळेत पोहोचलेत. राष्ट्रगीत संपल्यानंतर कोणीही 'भारत माता की जय' म्हटले नसल्याचे त्यांच्याही लक्षात आले. मात्र, तेथे उपस्थित समाजसेविका गुंजन गोळे यांनी मोठ्या आवाजात ‘भारत माता की जय’ घोषणा दिल्याने शाळेत तणाव निर्माण झाला होता. ही बाब विहिंपचे अध्यक्ष सुरेश चिकटे यांच्यासह अनेकांच्या लक्षात आली. शिक्षिकेसह या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. यावेळी विश्व हिन्दू परिषदेचे अध्यक्ष सुरेश चिकटे, अभिषेक दीक्षित, निशाद जोध, ऋषिकेश दीक्षित, मयूर श्रीवास्तव, सुभाष मसदकर, योगेश मालेकर, गुंजन गोळे, अतुल खोंड, जितेंद्र श्रीवास्तव, गजानन सोनवणे उपस्थित होते.
विश्व हिन्दू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने मुख्याध्यापकांची चौकशी आरंभली आहे. शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांना नोटीस बजावली आहे. चौकशीअंती पुढील कारवाईची दिशा ठरवू.
- यू.एल. पाटील,
पोलीस निरीक्षक.
एडीफायचे मुख्याध्यापक ‘भारत माता की जय’ म्हणत नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहानिशा केली असता ही बाब सत्य असल्याचे लक्षात आले. शाळेतील शिक्षिकेने नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार पुढे दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- विजय शर्मा,
विदर्भ प्रांत गोरक्षा प्रमुख.