आपचे बैलबंडी, गाढव घेऊन डेरा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:42+5:302021-06-17T04:09:42+5:30
पान २ बॉटम शेकडो लाभार्थींचा सहभाग, पीएम आवास घरकुल योजनेतील निधीची मागणी चांदूर रेल्वे : पीएम आवास घरकुल ...
पान २ बॉटम
शेकडो लाभार्थींचा सहभाग, पीएम आवास घरकुल योजनेतील निधीची मागणी
चांदूर रेल्वे : पीएम आवास घरकुल योजनेतील निधीसाठी बैलबंडी, गाढवासह लाभार्थींनी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे नगर परिषदेवर मंगळवारी डेरा आंदोलन केले. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी नगर परिषद कार्यालय परिसरात डेरा टाकला. जोपर्यंत निधीचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत डेरा आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला होता. आमदारांच्या मध्यस्थीने सायंकाळी ६ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी व नगर परिषदेचे माजी सभापती मेहमूद हुसेन यांनी केले. या आंदोलनात मुलाबाळांसह लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले. लाभार्थींच्या मागणीनुसार तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी आम आदमी पार्टीने निवेदन देऊन १४ जूनपर्यंत अल्टिमेटम् दिला होता. नव्याने मंजूर झालेल्या ४०५ घरकुल लाभार्थींनाही पहिला टप्पा देण्याची मागणी केली आहे.
सिनेमा चौकातील धर्मशाळेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. नगर परिषदेत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांसोबत चर्चा करण्यात आली. मात्र, काहीही तोडगा न निघाल्याने अखेर आंदोलकांनी नगर परिषद परिसरात डेरा टाकला. लाभार्थींनी नगर परिषद परिसरातच चूल पेटवून स्वयंपाक केला. आंदोलनाला साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी विनोद जोशी, विजय रोडगे, शेख हसन व काही लाभार्थींनी मनोगत व्यक्त केले. जया तायडे, उषा प्रजापती, कुसूम वऱ्हाडे, छाया मोरे, जया बेराड, माधुरी भेंडे, गौतम जवंजाळ, गजानन चौधरी, भीमराव बेराड, गणेश क्षीरसागर, नीलेश गिरूळकर, चरण जोल्हे, पंकज गुडधे, संजय डगवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
दरम्यान, आंदोलनस्थळी दाखल झालेले आमदार प्रताप अडसड यांनी लवकरात लवकर निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. त्यामुळे सायंकाळ ६ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भाजप नगरसेवक अजय हजारे, पदाधिकारी वसंतराव खंडार, संदीप सोळंके उपस्थित होते.
-------------------
नेत्यांनी चर्चेसाठी यावे - नितीन गवळी
तिसऱ्या टप्प्याचे ३०२ कोटी ५० लाख रुपये निधी केंद्राकडून राज्याकडे जमा झाल्याचे पत्र आहे. नगर परिषद काँग्रेसची व राज्यात काँग्रेसप्रणीत सत्ता आहे. ते तीन महिन्यात निधी का आणू शकले नाही व आता कधीपर्यंत निधी आणणार, याचे उत्तर काँग्रेस नेत्यांनी द्यावे व चर्चेसाठी यावे, असे नितीन गवळी यांनी म्हटले.
2)
नेते राहतात बंगल्यात
काँग्रेस नेत्यांच्या चार हजार चौरस फुटाच्या बंगल्यात केवळ तीन-चार सदस्य राहतात. पदाधिकारी, अधिकारीसुद्धा मोठ्या स्लॅबच्या घरात ऐशोआरामात राहतात. मग त्यांना या घरकुल लाभार्थींच्या गरिबीची काय जाणीव राहणार, असे रोखठोक मत नगर परिषदेचे माजी सभापती मेहमूद हुसैन व माजी उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी व्यक्त केले.