पान २ साठी
करजगाव : एकविसाव्या शतकात मोबाईलने आपले पाय अगदी घट्ट रोवले आहेत. मानवी जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून जणू मोबाईलची ओळखच निर्माण झाली आहे. गप्पागोष्टी, खेळणे या सर्व पारंपरिक गोष्टी बाजूला सारून तरुणाईसह ज्येष्ठ मंडळीही मोबाईलप्रेमी झाली आहेत. २०० रुपयांत इंटरनेटचा पॅक मिळत असल्याने तरुणाईसोबत ज्येष्ठांनीही सोशल मीडियाला पसंती दिली आहे.
आता तर सामाजिक माध्यमातून अनेक प्रकारचा चॅलेंज ट्रेंड सुरू झाला आहे. फेसबूकवर त्याची अधिकच चलती आहे. त्यात आयुष्यभराचा जोडीदार, कपल चॅलेंज, सिंगल चॅलेंज, रुबाबदार चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, डॉटर चॅलेंज अशा विविध विषयांची धूम आहे. असल्या प्रकारच्या ट्रेंडने सध्या सर्वांना भुरळ घातली आहे. यापासून शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकारी, नेते मंडळीही अलिप्त राहिलेली नाहीत. अशा ट्रेंडने प्रभावित होऊन कित्येक जण आपले कुटुंबीय, पत्नी, मुलीसोबत बेफाम फोटो व्हायरल करीत आहेत. परंतु, असल्या प्रकाराने मुली, महिलांच्या छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.