धोतरखेड्याचा चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:33+5:302021-06-27T04:09:33+5:30

महावितरणने कापली वीज : १२ लाख ग्रामपंचायतीकडे थकीत परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत धोतरखेडा गावातील पाणीपुरवठा चार दिवसांपासून ...

Dhotarkheda water supply cut off for four days | धोतरखेड्याचा चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

धोतरखेड्याचा चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद

Next

महावितरणने कापली वीज : १२ लाख ग्रामपंचायतीकडे थकीत

परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत धोतरखेडा गावातील पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद आहे.

४ हजार २०० लोकसंख्या असलेल्या या गावाला चार बोअरवेलवरून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. यादरम्यान वीज बिलापोटी १२ लाख १४ हजार रुपये ग्रामपंचायतकडे थकीत झाल्यामुळे महावितरणने या बोअरवेलचा वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे धोतरखेड्यात ही पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

गावकऱ्यांकडे जवळपास १५ लाख रुपये पाणीपट्टी व कराच्या रूपाने थकीत आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे वसुलीचे प्रमाण केवळ २० ते २२ टक्केच असल्यामुळे ग्रामपंचायत थकीत वीज बिलाचा भरणा करू शकलेली नाही. मागील मार्च महिन्यात ८० हजार रुपये वीज बिलापोटी महावितरणकडे ग्रामपंचायतने भरले आहेत. महावितरणला वीज बिलाचे दरमहा पैसे हवे आहेत.

दरम्यान, चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे धोतरखेडावासी त्रस्त झाले आहेत. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काहींनी दोन दिवस गावाला टँकरने पाणी पुरविण्याचा प्रयत्न केला. पण, आता हे टँकर दिसेनासे झाले आहेत. आजही गावचा पाणीपुरवठा खंडित आहे.

-- राजकारण तापले--

खंडित पाणीपुरवठा आणि थकीत वीज बिलाच्या अनुषंगाने गावपातळीवर काही विरोधकांनी राजकारण तापविले आहे. आरोप-प्रत्यारोप ते करीत आहेत. ग्रामपंचायत थकीत वसुली मिळविण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

-- उपसरपंच यांच्या घरावर मोर्चा--

खंडित पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने २२ जूनला सायंकाळी दीडशे महिलांसह काही युवक उपसरपंचाच्या घरावर धडकले. उपसरपंचांचे समर्थकही गोळा झाल्याने वातावरण तापत असल्याचे बघून काहींनी सामंजस्याची भूमिका स्वीकारली आणि वातावरण निवळले.

ग्रामसेवकाची वाट अडवली--

जास्तीत जास्त वसुली करून गावाचा पाणीपुरवठा सुरू करण्याकरिता रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायतमध्ये काम करून घरी परतणाऱ्या ग्रामसेवकांची काहींनी मंगळवारी रात्री वाट अडविण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच दुचाकीस्वार युवकांनी त्या ग्रामसेवकांना तेवढ्या रात्रीला रस्त्यात गाठले व ग्रामपंचायतमध्ये परत नेण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Dhotarkheda water supply cut off for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.