राज्यातील शिक्षणाधिका-यांवर शिस्तीचा बडगा, अप्रशिक्षित शिक्षकांचा मुद्दा, कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 06:00 PM2017-12-22T18:00:59+5:302017-12-22T18:01:42+5:30
- प्रदीप भाकरे
अमरावती - महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने मागितलेली अप्रशिक्षित शिक्षकांची माहिती न दिल्याने राज्यातील सर्वच शिक्षणाधिका-यांवर शिस्तभंगाचा बडगा उगारला जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती खुलाशासह २५ डिसेंबरपर्यंत सादर करावी, अन्यथा कामात हलगर्जी केल्यामुळे शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, अशी तंबी मिळाल्याने प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिका-यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
अप्रशिक्षित शिक्षकांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत ‘डीईएलईडी’ (डीटीएड) पदविका प्राप्त न केल्यास त्यांची सेवा आपोआप संपुष्टात येईल, असा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासंदर्भात सर्व शिक्षणाधिका-यांकडून अप्रशिक्षित शिक्षकांची माहिती मागविण्यात आली. त्याला अनुसरून सर्व शाळा मुख्याध्यापकांना नोटीस पाठविण्यात आल्या असून, त्यांनी साक्षांकित प्रती आपल्याकडे कायम दस्तावेज म्हणून ठेवायच्या आहेत. एकही शाळा नोटीसविना राहिली नसल्याची माहिती क्षेत्रीय, विभागीय व राज्यस्तरीय टप्प्यावरून महाराष्ट्र विद्या प्राधिकरणास मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी ११ सप्टेंबरची डेडलाइन ठरवून देण्यात आली. मात्र, भंडारा येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा अपवाद वगळता राज्यातील कुठल्याही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक वा माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी ही माहिती पोहचविली नाही. त्यासाठी ७ सप्टेंबरच्या एका पत्राद्वारे प्राधिकरणाने खंत व्यक्त करून ३ आॅक्टोबरची सुधारित मुदत दिली. त्यानंतर पुन्हा २५ आॅक्टोबरपर्यंत मुदत देऊनही माहिती न मिळाल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने सूचना करण्यात आली. या प्रकरणात प्रचंड लेटलतीफी उघड झाल्यानंतरही पुन्हा अंतिम मुदत १३ नोव्हेंबर करण्यात आली. भंडारा, कोल्हापूर, बुलडाणा, सातारा या जिल्ह्यांतून माहिती पाठविली, पण ती अपूर्ण असल्याचे निरीक्षण प्राधिकरणाने नोंदविली. वारंवार वाढवून दिलेली मुदत, व्यक्त केलेली खंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने साधलेला संवाद तसेच स्मरणपत्रांना न जुमानणाºया शिक्षणाधिका-यांना शेवटी १६ डिसेंबरच्या पत्रान्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा २५ डिसेंबरपर्यंत लेखी खुलासा व प्रलंबित माहिती सादर करण्याचे निर्देश महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांनी दिले आहेत.
वर्तणुकीचा नियमभंग
शिक्षणाधिका-यांनी वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन केले नाही व माहिती पाठविण्याबाबत विलंब केल्याचे आढळून आल्याचे निरीक्षण मगर यांनी नोंदविले. निर्देशांची अवहेलना, कार्यालयीन शिस्तीचे अनुपालन न करणे ही कृती वर्तणूक नियमांचा भंग करणारी असल्याने आपणाविरूद्ध शिस्तभंगविषयक कारवाई का करण्यात येऊ नये, अशी तंबी वजा विचारणा महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाने नोंदविली आहे.