सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:14 AM2021-05-12T04:14:27+5:302021-05-12T04:14:27+5:30
अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आदी बाबी साहाय्यभूत ठरत असून त्यावर शेतकरी ...
अमरावती : सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आदी बाबी साहाय्यभूत ठरत असून त्यावर शेतकरी बांधवांनी भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
सोयाबीन बियाणे नाजूक असल्याने व मागील तीन वर्षात पिक काढणीच्या वेळेस आलेल्या संततधार पर्जन्याचा सोयाबीन पिकाच्या बियाणे उगवणक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊन बियाण्याची उगवण न झाल्याबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:चे घरगुती बियाणे ठेवणे व बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणीसाठी वापर करणे आवश्यक आहे. रासयनिक व जैविक बीजप्रक्रियेचा सोयाबीन बियाण्याच्या उगवणक्षमतेवर चांगला परिणाम होतो. मात्र, सोयाबीन बियाणे कवच गाजूक असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने बीज प्रक्रिया करून तदनंतरच बियाण्याचा पेरणीसाठी वापर करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
सोयाबीन पिकाच्या उत्पादनवाढीमध्ये पिक व्यवस्थापनातील लागवड तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. योग्य पीकघनतेसाठी बी.बी.एफ. तंत्रज्ञानाचा अवलंब, टोकण पद्धतीत पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारणामुळे पिकाची वाट जोगदार होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच यामुळे पेरणीसाठी बियाणे कमी लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत होते, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.
बॉक्स
सोयाबीन पिकावर आवश्यक खत मात्रा बहुतांशी पेरणीच्या वेळेस देण्यात येतात. त्यामुळे आवश्यक खते शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याबाबत नियोजन करावे. सोयाबीन पिकावर चक्री भुंगा, खोड माशी, पाने खाणाऱ्या अळ्या या प्रमुख किडींचा व शेंग करपा, तांबेरा व मोझॅक या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. कृषी विभागाच्या सल्ल्याने नियोजन करण्याचे आवाहन आहे
बॉक्स
प्रत्येक टप्प्यावर व्यवस्स्थापन महत्त्वाचे
कृषी विभागामार्फत सोयाबीन बियाणे तयार करणे, बीज प्रक्रिया, पीक व खत व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन आदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांनी पीक पद्धती व सोयाबीन बियाणे व आनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शन घ्यावे. सोयाबीन उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरणाऱ्या उपरोक्त बाबींचा शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.