अमरावती : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या निवडणकीतून ५५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर ५० उमेदवार रिंगणात आहेत. चार सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून चार संचालकांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता १७ जागांकरिता ही निवडणूक होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकपदाकरिता १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. २२ सप्टेंबर रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ४६ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले. यापूर्वी दोन दिवसात ९ जणांनी नामांकन अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे १०५ पैकी ५५ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात ५० उमेदवार आहेत. निवडणुकीत कायम असलेल्या उमेदवारांना गुरुवार, २३ सप्टेंबर रोजी चिन्हवाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर बँकेच्या निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
ठाकरे, ढेपे, पटेल, साबळे अविरोध
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी वरूड, नांदगाव खंडेश्र्वर, धारणी आणि तिवसा या चार तालुक्यातून प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे वरूड तालुक्यातून माजी आ.नरेशचंद्र ठाकरे, धारणीमधून जयप्रकाश पटेल, तिवसातून सुरेश साबळे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून अभिजित ढेपे अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता २१ पैकी १७ संचालक पदाकरिता ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे.