अमरावती : जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमात सन २०२०-२१ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीने मेळघाट व म्हाडा, मिनी म्हाडासाठी मंजूर केलेला सुमारे ८ कोटी ८६ लाख ५० हजार रुपयांचा निधी सन २०२१-२२ मध्ये ७ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी घटविल्याचा प्रकार शुक्रवार २५ जून रोजी उघडकीस येताच जिल्हा परिषदेत मेळघाट क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०२०-२१ या आर्थिक वर्षात मेळघाटसाठी जिल्हा रस्ते सर्वसाधारण चालू व नवीन कामे, जिल्हा रस्ते व इतर मार्ग किमान गरजा कार्यक्रम, जिल्हा रस्ते किमान गरजा कार्यक्रमांतर्गत सुमारे ८ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या मंजूर नियतव्यामध्ये ३९ लाख ४३ हजार रुपयांचे दायीत्व आहेत. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना आदिवासी क्षेत्र उपयोजनाकरिता चालू आर्थिक वर्षात साधारणपणे ६ कोटी ३१ लाख रुपये शंभर टक्के आदिवासी क्षेत्र असलेल्या मेळघाटसह म्हाडा मिनी म्हाडा गैरआदिवासी भागातील आदिवासी गावांकरिता एकूण ७ कोटी ९३ लाख २२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गतवर्षी दिलेल्या निधीपेक्षा सन २०२१-२२ या वर्षात निधी कमी मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सदस्य महेंद्रसिंग गैलवार, राहुल येवले आदींनी नाराजी व्यक्त केली.
कोट
जिल्हा वार्षिक योजना आदिवासी क्षेत्र उपयोजनांकरिता गतवर्षीपेक्षा यंदा निधी घटला आहे. शिवाय दायीत्व आहे. त्यामुळे पुरेसा निधी मिळावा याकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या नेतृत्वात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे मागणी रेटून धरू.
- महेंद्रसिंग गैलवार,
जिल्हा परिषद सदस्य