अमरावती : राज्यात नोव्हेंबर - डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय शासनाने मंगळवारी घेतला आहे. जिल्ह्यात या कालावधीत चांदूररेल्वे व वरुड तालुक्यामधील मृगबहराच्या संत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या सर्वेक्षणात चांदूररेल्वे तालुक्यात ६४ हेक्टरचे नुकसान दाखविले तर वरुड तालुक्याच्या नुकसानीची नोंद नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. खरिपाच्या हंगामात अपुरा पाऊस पडला असला तरी ११ नोव्हेंबर २०१४ ला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. प्रत्येक तालुक्याला याचा कमी अधिक प्रमाणात फटका बसला. नदी-नाल्याकाठची शेती खरडली गेली. चांदूररेल्वे व वरुड तालुक्यामधील संत्रापिकाच्या मृगबहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळे व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे संत्र्याच्या आंबिया बहरासाठी ताण बसला नाही. त्यामुळे या बहराची फूट झाली नाही. अतिवृष्टी व गारपिटीमुळे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले असताना कृषी विभागाद्वारा संत्रा पीक नुकसानीचे सर्वेक्षणच झाले नाही. केवळ चांदूररेल्वे तालुक्यामधील संत्रा पिकाचे ६४.१४ हेक्टरमध्ये व पपई पिकाचे ०.६० हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा २ डिसेंबरचा अहवाल आहे. अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानग्रस्तांना विशेष मदतीचा शासन निर्णय झाला असला तरी सर्वेक्षणाअभावी शेतकऱ्यांना मदत मिळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
गारपीटग्रस्तांच्या मदतीत जिल्ह्याला ठेंगा
By admin | Published: February 04, 2015 11:06 PM