मनीष तसरे
अमरावती : ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राज्यस्तरावर राबविण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून सोमवारी झाली. त्याअनुषंगाने अभियानातंर्गत दिव्यांग मेळाव्यांचा शुभारंभ नेमानी इन, शासकीय स्त्री रुग्णालय जवळ, अमरावती येथे झाला. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महानगरपालिका आयुक्त देवीदास पवार, उपजिल्हाधिकारी अनंत भटकर, समाजकल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, तहसिलदार विजय लोंखडे आदि उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने दिव्यांग कल्याण विभाग हा सामाजिक न्याय विभागापासून वेगळा करून एक नवीन विभाग तयार केला आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नियोजित शिबिरामध्ये उपलब्ध करून हाेते. प्रत्येक शासकीय कार्यालयाव्दारे शासकीय योजनांचे स्टॉल्स शिबिरामध्ये लावण्यात आले आहे. तसेच दिव्यांगाच्या विविध योजनांबाबतच्या माहिती पुस्तिकेचे वितरण या वेळी करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजना, जात प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, मतदार नोंदणी, दिव्यांगांना युडीआयडी (UDID) कार्ड वितरण, दिव्यांगांसाठी नवीन शिधा पत्रिका, शिधा पत्रिका मधील इतर फेरफार व नवीन नाव समाविष्ट करणे, दिव्यांगांना रोजगाराच्या संधी, बँकेतील कर्ज प्रकरणे, रोजगार नोंदणी इत्यादी लाभ दिव्यांगाना मेळाव्यात दिला गेला.