उपाययोजना : मार्चपूर्वी पाणीपुरवठा योजनेचे कार्यान्वयन, ८० मीटर उंचीवरील गाव, अमरावती : गेल्या ३०-३५ वर्षांपासून चिखलदरा तालुक्यातील डोमनी (फाटा) या टंचाईग्रस्त गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. ाता डोमनीवासियांचा नागरिकांचा पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष लवकरच संपणार असून गावासाठी मार्चपूर्वी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे.जि.प.च्या पाणीपुरवठा विभागामार्फत दरवर्षी उन्हाळ्यात डोमनी गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. बिहालीपासून जवळपास ८० मीटर उंच टेकडीवर डोमनी गाव वसले आहे. येथील नागरिकांना टेकडीखालून पाणी आणावे लागत होते. उन्हाळ्यात तर सगळेच जलस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांची अत्यंत ससेहोलपट होत होती. अशावेळी या गावाला जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. १८३ लोकवस्ती असलेल्या या गावाला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. सुमारे १८ लाख रुपयांच्या या प्रस्तावाला राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली. त्यानंतर डोमनी गावात पाणीपुरवठा विभागाने टेकडीखाली बोअरवेल करुन पाईपलाईनव्दारे गावात पाणी पोहोचविले. गावात सुमारे १० हजार लिटर क्षमतेच्या टाकीसह पाणी वितरण व्यवस्था उपलब्ध करुन दिली. ही योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून काही कामे पूर्ण होताच नवीन वीज जोडणी घेऊन या गावामध्ये पिण्याचे पाणी कायस्वरुपी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे प्रायोगिक तत्त्वावर प्रजासत्ताकदिनी योजनेची ट्रायल देखील घेण्यात आली. मार्चपूर्वी टँकरग्रस्त डोमनी गावाला कायमस्वरुपी पाणी सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी मेळघाटातील माखला, मेमना, लवादा, केकदाबोड, मालूर वन आदी टँकरग्रस्त गावांमध्येही पाण्याची कायमस्वरुपी उपाययोजना उपलब्ध केली आहे. (प्रतिनिधी)
मेळघाटातील डोमनी गाव ३० वर्षांनंतर होणार टँकरमुक्त
By admin | Published: January 28, 2015 11:06 PM