लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज करतानाच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिले.ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष भेटीद्वारे आढावा घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाची बैठक ना. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.बाधितांची संख्या कमी झाली तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये. उपचार यंत्रणा सुसज्ज करतानाच गावोगावी ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून भरीव जनजागृती करावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना उपचाराची व्यवस्था व तीन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्युकरमायकोसिससाठी ही मोहीम राबविण्यात आलेली आहे. मोझरी, वलगाव येथील कोविड केअर सेंटरवर उपचार सुविधेचा विस्तार, विशेषतः महिला व मुलांसाठी स्वतंत्र उपचार यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या परिसरात कंपन्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व सीएसआरमधून शंभर बेडचे रुग्णालय उभे राहत आहे. त्यानुसार नियोजित सर्व कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश ना. यशोमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.शासकीय रुग्णालयात २०० व्हेंटिलेटरशासकीय रुग्णालयांमध्ये २०० व्हेंटिलेटर आहेत. ते नादुरुस्त असतील, तर त्यांची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर, खाटा, ऑक्सिजन प्रणाली आदी सर्व व्यवस्था सुसज्ज ठेवावी, असे नाना पटोले यांनी सांगितले. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील उपाययोजना, मनुष्यबळ यांसह विविध बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.