अमरावती: रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या अपहारप्रकरणातील आरोपी डॉ. पवन मालुसरे याने रविवारी स्थानिक न्यायालयात आत्मसमर्पण केले. ११ जून रोजी जिल्हा न्यायालयाने मालुसरेचा जामीन अर्ज रद्द केला होता.
फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी डॉ. पवन मालुसरेंसह कोविड रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर अक्षय राठोड, एक परिचारिका, शुभम सोनटक्के, शुभम किल्लेकर, अनिल पिंजरकर, विनित फुटाणे अशा एकूण सात जणांना अटक केली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने पाच जणांना पुन्हा अटक केली होती, तर मालुसरे व परिचारिका हे अटकेपासून दूर होते. दरम्यान, जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्याने मालुसरे न्यायालयाला शरण गेला. बुधवारी त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे निरिक्षक शिवाजी बचाटे यांनी दिली.