(कॉमन) /
गणेश वासनिक
अमरावती: गतवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती, क्यार व महा च्रकिवादळाने आलेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठवावे लागणार आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १५ डिसेंबर रोजी प्राचार्यांना पत्र पाठविले आहे.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी पुत्रांना उच्च शिक्षण घेताना अडीअडचणी येऊ नये, यासाठी उच्च व शिक्षण विभागाने २१ नोव्हेंबर २०१९ आणि २६ नोव्हेंबर २०२० असे दोन प्रकारे शासनादेश जारी करून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोना महामारीच्या कारणास्तव परीक्षा शुल्क माफी देण्याबाबत विलंब झाला आहे. उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी विद्यापीठांना पत्र निर्गमित करून दुष्काळग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्राचार्यांना पत्र पाठवून सदर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठविण्याबाबत कळविले आहे. सन २०१९-२०२० च्या परीक्षा शुल्कमाफीची कार्यवाही केली जाणार आहे ही कार्यवाही करताना प्राचार्याना शासनादेशाचा आधार घ्यावा लागणार आहे. राज्यात एकूण ३४९ तालुके तर, अमरावती विद्यापीठ अंतर्गत ५६ तालुक्यांत दुष्काळग्रस्त शेतकरीपुत्रांना परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे.
----------------------
विद्यापीठ अंतर्गत ५६ तालुक्यांचा समावेश
- अमरावती : भातकुली, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, तिवसा, धारणी, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चिखलदरा.
- अकोला : अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला, बार्शिटाकळी व मुर्तिजापूर.
- यवतमाळ : कळंब, यवतमाळ, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, नेर, आर्णी, बाभुळगाव, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, वणी, मोरगाव व झरी.
- वाशिम: मालेगाव, वाशिम, रिसोड, मंगळूर पीर, मानोरा व कारंजा
- बुलडाणा : मलकापूर, चिखली, बुलडाणा, मोताळा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, खामगाव, शेगांव, संग्रामपूर, नांदुरा व जळगांव जामाेद.
----------------------------
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्राचार्याना दिले आहे. एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठवावे लागणार आहे. नवीन वर्षात शेतकरीपुत्रांना लाभ मिळेल, असे नियोजन आहे.
- हेमंत देशमुख. संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.