सुकळी कंपोस्ट डेपोत आता पशू शवदाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:15+5:302021-06-30T04:09:15+5:30
अमरावती : अनेकदा मृत जनावरे सुकळी कंपोस्ट डेपोत टाकण्यात आल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊन राष्ट्रीय हरित लवादाची फटकारही महापालिकेला ...
अमरावती : अनेकदा मृत जनावरे सुकळी कंपोस्ट डेपोत टाकण्यात आल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊन राष्ट्रीय हरित लवादाची फटकारही महापालिकेला बसली आहे. आता मात्र या सर्व डोकेदुखीतून महापालिकेची सुटका होणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुकळी कंपोस्ट डेपोत पशू शवदाहिनी तयार करण्यात येत आहे. राज्यात अशा प्रकारची तिसरी पशू शवदाहिनी ठरणार असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहराचे सार्वजनिक आरोग्य चांगले व पयार्वरणपूरक आरोग्यदायी राहावे, यासाठी कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे व त्यावर प्रक्रिया होणे महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आयुक्तांच्या संकल्पनेतून पंधराव्या वित्त आयोगाच्या २५ ते ३० लाखांच्या निधीतून सुकळी कंपोस्ट डेपोत डिझेलवर चालणारी पशू शवदाहिनी (ॲनिमल इन्सिनेरटर) तयार करण्यात येत आहे. शुक्रवारी या शवदाहिनीचे १२ ते १३ टन साहित्य संबंधित ठिकाणी पोहोचले आहे. या ठिकाणी सध्या मशीनरीसाठी प्लॅटफाॅर्म तयार करण्यात येत आहे. येथे २०० किलो क्षमतेच्या मृत जनावरांवर प्रक्रिया केली जाणार असल्याचे महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे यांनी सांगितले.
बॉक्स
३० मीटर उंचीवर राहणार चिमणी
चार महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून आवश्यक एनओसी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ३० मीटर उंचीवर येथील चिमणी राहणार आहे. येथे मृत जनावरांचे विघटन व प्रक्रिया होणार असल्याने यापासून पसरणारे आजार व दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. वातावरणातील प्रदूषणदेखील कमी होणार आहे.