युवा शेतकऱ्याची एफडीएकडे तक्रार : बनावट देयके देऊन फसवणूकअमरावती : पोल्ट्री फार्ममधील पक्षांना कालबाह्य औषधी देण्यात आल्याने सुमारे तीन हजार कोबंड्या दगावल्या. तसेच औषधी विक्रेत्याने युवा शेतकऱ्याला बनावट देयक देऊन फसवणूक केल्याचाही प्रकार उघड झाला आहे. या धक्कादायक प्रकाराची तक्रार युवा शेतकऱ्याने अन्न व औषधी प्रशासनाकडे केली आहे. शुक्रवारी औषधी निरीक्षकांनी औषधी विक्रेत्याच्या प्रतिष्ठानावर धाड टाकून चौकशी केली. एकीकडे शेतकऱ्यांच्या हितार्थ शासनास्तरावर प्रयत्न केले जात आहे. बेरोजगार युवा शेतकऱ्यांना व्यवसाय किंवा लघु उद्योगात प्राधान्य दिले जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कालबाह्य औषधी विक्री करून त्यांची फसवणूक होत आहे. बडनेरास्थित बारीपुऱ्यातील रहिवासी पंकज ऊर्फ संदीप राजेंद्र दारोकार या युवा शेतकऱ्याने परिश्रम घेऊन पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी तब्बल तीन हजार कोबंड्याचे संगोपन करीत व्यवसाय वाढविला होता. पक्ष्यांना औषधी देण्यासाठी ते प्रमोद मेटकर यांच्यामार्फत त्रिमूर्ती डिस्ट्रीब्युटरकडे गेले. त्यांनी पक्ष्यांना देण्यासाठी एनडी किंल्ड नावाची औषध मागितले होती. मात्र, प्रमोद मेटकर याने 'इनअॅक्टिव्हेटड एनडी' नावाचे औषध दिले. त्या औषधींच्या बॉटलवर 'एक्सायरी डेट' व निर्मितीची तारीख नसल्याचे दारोकार यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी प्रमोद मेटकरला विचारणी केली. मात्र, त्या औषधींच्या बॉटलवरील एक्सायरी डेट व निर्मितीची तारीख ही बॉक्समधील दोन बाटला फुटल्यामुळे पुसल्या गेल्याची बतावणी प्रमोद मेटकर याने केली. त्यामुळे दारोकार यांनी प्रमोद मेटकरवर विश्वास ठेवून ती औषधी खरेदी केली. मात्र, त्यांना चैतन्य पोल्ट्री फार्मचे बिल देण्यात आले. ती औषधी दारोकार यांनी पक्ष्यांना टाकली असता सुमारे तीन हजार पक्षी एकापाठोपाठ दगावले. हा गंभीर प्रकार बघता दारोकार यांनी अन्न व औषधी विभागाकडे धाव घेतली. या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. दारोकार यांनी त्या कालबाह्य औषधीच्या रिकाम्या बॉटल व बनावट देयक एफडीएकडे सोपविल्या आहेत. याप्रकरणात शुक्रवारी औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी घरोटे यांनी औषधी विक्री प्रतिष्ठानावर धाड टाकून चौकशी आरंभली होती. (प्रतिनिधी)पोल्ट्री फार्म व्यवसायीकाच्या तक्रारीवरून संबधीत औषधी विक्रेत्यांची चौकशी आरंभली आहे. निरीक्षकांनी विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानावर जाऊन औषधीची नमुने जप्त केली असून चौकशीअंती पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. - सी.के.डांगे, अन्न व औषधी प्रशासन विभाग.
कालबाह्य औषधींमुळे तीन हजार कोंबड्या दगावल्या
By admin | Published: February 07, 2017 12:07 AM