वाठोडा शिवारातील घटना : १२ तासांनी मृतदेह बाहेरवरूड : नजीकच्या वाठोडा (चांदस) येथील शेतशिवारात विहिरीत काम करीत असताना विहिरीची दरड कोसळून एका शेतकऱ्याचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. अन्य एक कसाबसा विहिरीतून बाहेर आला. तब्बल १२ तासानंतर ढिगाऱ्याखाली दबलेला मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. घनश्याम ऊर्फ अजाब कृष्णराव देशमुख (४२,रा.वाठोडा) असे मृताचे नाव आहे. ही घटना १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. घनश्याम व पांडुरंग देशमुख हे दोन भाऊ शेतातील विहिरीचे बांधकाम करीत होते. त्यासाठी दोघेही विहिरीत उतरले असताना काही वेळातच विहिरीची दरड कोसळली. यामध्ये घनश्याम मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला तर पांडुरंग कसाबसा विहिरीतून बाहेर आला. नागरिकांनी लगेच पोलिसांना पाचारण केले. विहिरीतील माती उपसण्याचे काम लगेच सुरू झाले. परंतु तब्बल १२ तास घनश्यामचा मृतदेह आढळून आला नाही. अखेर १४ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. सहायक पोलीस निरीक्षक चित्तरंजन चांदुरे, उपनिरीक्षक प्रफुल्ल डाहुले यांनी मृतदेह विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रूग्णालयात पाठविला. (तालुका प्रतिनिधी)
विहीर खचल्याने शेतकऱ्याचा दबून मृत्यू
By admin | Published: April 15, 2016 12:06 AM