दिवाळी काळात परगावांतून येणारे नागरिक वाढले; टेस्ट मात्र तेवढ्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:00 AM2020-11-23T05:00:00+5:302020-11-23T05:00:35+5:30
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना संपला, अशा थाटात काहींना मास्क, फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला. याच काळात दिवाळीचा सण आला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे जरी म्हटले जात असले तरी यंदाच्या दिवाळीत ‘कोरोना इफेक्ट’ जाणवलाच. बाहेगावी असणारे बहुतेक सर्वच दिवाळीला घरी गावी आलेत; मात्र कोरोना चाचणी करायचा विसर पडला. या आठवड्यात चाचण्यांची संख्या रोडावली. याला कारणही नेमके हेच आहे. याशिवाय दिवाळीच्या अगोदरपासून बहुतेक नमुने संकलन केंद्रेही बंद होती. त्यामुळेही चाचण्यांच्या संख्येत कमी आलेली आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात नऊ हजारांवर कोरोना पाॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने हादरा बसला. नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्ग घटला अन् नागरिक बिनधास्त झाले. जणू काही कोरोना संपला, अशा थाटात काहींना मास्क, फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला. याच काळात दिवाळीचा सण आला. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फज्जा उडाला. बहुतेक ठिकणी असलेले कोरोना नमुने संकलन केंद्रेही बंद झाली. नागरिक चाचणी टाळू लागल्याने या काळात चाचण्यांची संख्या कमी आली. प्रशासनानेही प्रोटोकाॅलनुसार चाचणी सुरू केल्याने कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णसंख्या घटली आहे.
दरम्यान, दिवाळीच्या काळात झालेल्या गर्दीत ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्ती व असिम्प्टमॅटिक रुग्ण वावरल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आता शाळा सुरू झाल्याने शिक्षकांचीही चाचण्यांसाठी गर्दी झाली आहे.
आता कोणालाही करता येणार आरटी-पीसीआर टेस्ट
जिल्ह्यात तसे पाहता ऑक्टोबर महिन्यांपासूनच नमुने संकलन केंद्रावर चाचण्या करण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी व्हायला लागली. याचा थेट परिणाम अहवालांवर झाला. कोरोनाग्रस्तांची संख्या रोडावल्याने नागरिकांमध्ये बिनधास्तपणा वाढला.
सुरुवातीला चाचण्यांसाठी गर्दी वाढली होती. त्यानंतर आरोग्य विभागाचा प्रोटोकाॅल आला. त्यानुसार चाचण्या सुरू केल्याने नागरिक परतायला लागले. आता मात्र हे निकष बाद ठरविण्यात येऊन कोणालाही आरटी-पीसीआर चाचणी करता येते.