धूळघाट रोहयो अपहाराची 'तारांकित' माहिती दडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:01 AM2018-05-01T00:01:33+5:302018-05-01T00:02:00+5:30
धूळघाट रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धूळघाट रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी मेळघाटचे आ. प्रभूदास भिलावेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. परंतु, विभागीय आयुक्तांच्या रोहयो उपायुक्त कार्यालयाने याची माहिती न पाठविता ती दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे रोहयो अपहाराची पायमुळे किती खोलवर रूजलीत, हे स्पष्ट होते.
धुळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रातील ग्राम पळसकुंडी येथे रोहयो कामात अनियमितता झाल्याप्रकरणी सहा महिन्यांच्या चौकशीनंतर नऊ जणांवर धारणी पोलिसात गुन्हे दाखल झाले. मात्र, हे प्रकरण पोलिसांत जाण्यापूर्वी आ. भिलावेकर यांनी तारांकित प्रश्न क्रमांक ११८५६ अन्वये विधिमंडळात पोहचविले. त्यानुसार महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी शशिकांत भिसे यांनी १९ मार्च २०१८ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व धारणी तहसीलदारांच्या नावे पत्र पाठवून धूळघाट रेल्वेच्या वन परिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण, वनरक्षक सविता बेठेकर यांनी रोहयोच्या कामात अनियमितता केल्याची माहिती पाठविण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी शासनाने चौकशी केली अथवा नाही, रोहयो अपहारातील दोषींवर गुन्हे दाखल होण्यास विलंब का? अशा प्रश्नान्वये माहिती वजा उत्तर पाठविणे अनिवार्य होते. परंतु, रोहयो कामांत अपहाराची चर्चा विधिमंडळात झाल्यास अमरावतीची लक्तरे वेशीवर टांगली जातील, या भीतीपोटी हा तारांकित प्रश्न ‘मॅनेज’ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विधिमंडळात तारांकित मॅनेज करण्यापर्यंत प्रयत्न करू शकतात, तर पोलिसांना ‘मॅनेज’ करणे ही बाब दोषींसाठी क्षुल्लक आहे. त्यामुळे धारणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनात ताब्यात घेण्यात आलेल्या नऊ आरोपींना सन्मानाने सोडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४६७, ४७१, ४७७ अन्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले होते.
भिलावेकर 'नॉट रिचेबल'
धूळघाट रेल्वेच्या आरएफओ व वनरक्षकाने रोहयो कामात अपहार केल्याप्रकरणी आ. प्रभुदास भिलावेकर यांनी तारांकित प्रश्न विधिमंडळात दाखल केल्यानंतर माहिती मिळाली काय याची विचारणा केली असता, ते 'नाट रिचेबल' आढळून आले.
आरोपींचे मेडिकल झाल्यानंतर सोडले?
धूळघाट रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत ग्राम पळसकुंडी येथे रोहयो कामात अनियमितता झाल्याप्रकरणी नऊ आरोपींना २६ एप्रिल रोजी चौकशीासाठी ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींचे मेडिकल करण्यात आले. मात्र, त्यानंतर महसूल व वनविभागाच्या वरिष्ठांनी सूत्रे हलविताच ताब्यात घेतलेल्या नऊ आरोपींना समज देऊन सोडूण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना सोडून देण्याची घटना ही जिल्ह्यात बहुधा पहिली असावी.
रोहयो उपायुक्तांचा प्रतिसाद नाही
आ. प्रभूदास भिलावेकर यांनी विधिमंडळात सादर केलेल्या तारांकित प्रश्नाबाबत १९ मार्च २०१८ रोजी शासनाकडे माहिती पाठविण्यात आली नाही. याबाबत विभागीय आयुक्तांच्या रोहयो कार्यालयाचे उपायुक्त शहाजी पवार यांच्याशी ‘लोकमत’ने वारंवार संपर्क साधूनदेखील त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही, हे विशेष. रोहयो कार्यालयात अनियमिततेने कळस गाठला असून, यातील वास्तव लवकरच समोर येण्याचे संकेत आहे.