अमरावती : प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व सुदृढ शरीरासाठी आहारात निरनिराळ्या भाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख करून देणारा महोत्सव महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी येथे केले.
कृषी विभागातर्फे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते १४ ऑगस्ट रोजी वलगाव येथील सिकची सभागृहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार सुलभा खोडके, आ. रवि राणा, माजी खासदार अनंत गुढे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सीईओ अविश्यांत पंडा, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान उपस्थित होते.
ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या रानभाज्या उपलब्ध होतात. त्यातून ग्रामीण नागरिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या जंक फूडच्या सवयींमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अनेकदा शहरांमध्येही कुपोषण आढळून येते. आहारातील भाज्यांचे महत्व ओळखून आता महिला व बाल विकास विभागातर्फे परसबाग उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाज्यांचे महत्त्व नव्या पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी अंगणवाडीला जोडून परसबाग उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यानी सांगितले. आ. खोडके, आ. राणा, अनंत गुढे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
बॉक्स
महोत्सवात ५९ रानभाज्यांचा समावेश
रानभाजी महोत्सवात मेळघाटसह विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानावनात नैसर्गिकरीत्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, कर्टुले, शतावरी, भुईआवळा, सुरण, अरबी, कमळकाकडी, कपाळफोडी, उंबर आदी ५९ रानभाज्यांचे २८३ नमुने सादर करण्यात आले.