अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:23+5:302021-02-24T04:14:23+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या २६ फेब्रुुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या हिवाळी-२०२० परीक्षा पुढे ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या २६ फेब्रुुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या हिवाळी-२०२० परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लागू झाल्यामुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे नियोजन २६ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याने परीक्षांवर तूर्त गंडातर आले आहे. अगोदरच अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश, अभ्यासक्रम आदी बाबी माघारल्या आहेत. आता कोरोना संसर्गाने यात भर घातली आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येमुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. सोमवारी रात्री ८ पासून लॉकडाऊन लागू झाले असून, १ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत हे आदेश राहणार आहेत. अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रमांच्या सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले. परंतु, लॉकडाऊनमुळे आता या परीक्षा पुढे घेण्यात येतील, असे पत्र परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.
--------------------
विद्यापीठाची कोरोना ‘हॉट स्पॉट’कडे वाटचाल
विद्यापीठाच्या परीक्षा विभाग आणि लेखा विभागात संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परीक्षांचे ऑनलाईन कामकाज सांभाळणाऱ्या लर्निंग स्पायरल या कंपनीचे काही कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरदिवशी विद्यापीठात कुणी तरी अधिकारी, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. प्रशासकीय इमारतीत काही विभागप्रमुखांना कोरोनाने ग्रासले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विद्यापीठ कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ तर होणार नाही ना, अशी भीती वर्तविली जात आहे.
----------------------