अमरावती : जिल्ह्यातील कोतवालांच्या ११६ रिक्त पदाकरिता रविवारी १४ केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी एकूण ५,३५६ परीक्षार्थींनी अर्ज केले होते. परंतु प्रत्यक्षात २३१५ परीक्षार्थींनीच परीक्षा दिली असून, ४१ परीक्षार्थी हे गैरहजर होते. चौथी पास पात्रता असलेल्या या परीक्षेमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांसह इंजिनिअरही बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असून, ऑनकॅमेरा पेपर तपासणीनंतर निकालही जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन जाहीर केला आहे.
महसूल विभागातील गावपातळीवरचा शेवटचा दुवा म्हणून कोतवालपदाचे महत्त्व आहे. कोतवाल हा प्रशासनाचा एक भाग असला तरी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्याला कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नाही. त्याला एक प्रकारचे मानधन स्वरूपात १५ हजार रुपये इतके वेतन दिले जाते. परंतु बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच सरकारी नोकरीचे घटलेले प्रमाण लक्षात घेता चौथीपास अर्हता असलेल्या कोतवाल पदासाठी जिल्ह्यात अनेक पदवी, पदव्युत्तर-पदवीधारकांनीही अर्ज केले होते. याबरोबर काही इंजिनिअर असलेल्या तरुणांनीदेखील कोतवाल परीक्षा दिली. जिल्ह्यात रविवारी ११६ पदांकरीता पार पडलेल्या परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यावर एक परीक्षा केंद्र देण्यात आले होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षार्थींना त्यांनी सोडविलेल्या उत्तरांची कार्बनकॉपीदेखील देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच परीक्षेचा निकाल ही जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून, सोमवारी प्राथमिक निवड यादी प्रत्येक तालुकास्तरावर लावण्यात येणार आहे. यानंतर ज्या उमेदवारांचा या निवड यादीवर काही आक्षेप असल्यास त्या आक्षेपाची पूर्तता करून अंतिम निवड यादी ही दि. ३० ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात कोतवालांची परीक्षा सुरळीत पारा पडली असून, कोणत्याही केंद्रावर अनूचित प्रकार घडलेला नाही. सर्व परीक्षार्थींना त्यांनी सोडविलेल्या उत्तरांची कार्बनकॉपी देण्यात आली आहे. तसेच ऑन कॅमेरा पेपरची तपासणी करण्यात आली असून, सोमवारी प्राथमिक निवड यादी जाहीर होईल.
- विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी