- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यावर त्यांना केवळ चांगल्या दर्जाची फळांची विक्री व उर्वरित फळांवर प्रक्रिया करीत त्याचा ज्यूस बाजारात विक्री करून अतिरिक्त नफा कमविण्याची किमया अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील संत्रा उत्पादकांनी साधली आहे. संत्राबागांची खरेदी होत असताना केवळ पहिल्या व दुसऱ्या दर्जाचीच फळे व्यापारी नेतील, उर्वरित फळांवर प्रक्रिया करण्याचा निश्चय शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी केला. यातूनच विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी उभी राहिली. शेतकरी मनोहर सुने, अशोक यावल, श्रीपाद आसरकर, सचिन यावले, प्रमोद कुऱ्हाळे, उषा रतीलाल सातपुते, विलास दामोदर, पवन निमकर, नीलेश राजस यांनी यासाठी पुढाकार घेतला.
कंपनीमध्ये सुमारे पाचशेहून अधिक शेअरधारकांचा समावेश आहे. भागभांडवल व अनुदानातून प्रक्रिया उद्योग उभा राहिला. कंपनीचा स्वत:च्या मालकीचा बॉटलिंग प्लांट असून ‘ऑरेंज एनर्जी’ हे ज्यूस ब्रँड बाजारात उपलब्ध झाले. पूर्वी शेतकऱ्यांच्या बागांतील संत्र्यांची छाटनी केल्यावर ती फेकून दिली जात होती किंवा स्थानिक व्यापाºयांना त्याची विक्री केली जात होती.
वेअरहाऊस उभारलेभागभांडवलधारक व ३० शेतकरीगट असे कंपनीचे हजाराहून अधिक सदस्य आहेत. कंपनीने शिरजगाव कसबा येथे वेअरहाऊस आहे. संत्रा व अन्य शेतमालाची साठवणूक येथे केली जाते. कंपनीचे अत्याधुनिक ज्यूस प्रक्रिया संयत्र असून याच ठिकाणी शेतमालसंबंधित अन्य उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कंपनीकडे सहा हजार स्केवअरफुटमध्ये ज्यूस सयत्र आहेत.
शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम शेतमालास हमीभाव, बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारांची संधी निर्माण करून देणे, शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बी-बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून देणे, वेअर हाऊसचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे यासह अनेक उपक्रम कंपनीच्या माध्यामतून राबविले जात आहेत.
शेतकऱ्यांना फायदा व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल. ज्यूस विक्रीतून शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा अतिरिक्त नफा होणार आहे. वर्षभर संत्रा प्रक्रिया सुरू रहावी, असा आमचा प्रयत्न आहे.- मनोहर सुने, अध्यक्ष, विदर्भ शेतकरी कृषी माल प्रक्रिया अॅण्ड उद्योग प्रोड्युसर कंपनी, शिरजगाव कसबा