सोयरिक करून अतिप्रसंग, नंतर लग्नास दिला नकार तरुणीचे शोषण : फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: March 7, 2024 05:45 PM2024-03-07T17:45:56+5:302024-03-07T17:46:32+5:30
तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो विषय दोघांच्याही घरापर्यंत पोहोचला.
अमरावती : सोयरिक निश्चित करून आता आपण लग्न करणारच आहोत, अशी बतावणी करत एका तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यानंतर तो मी नव्हेच असा पवित्रा घेत लग्नास नकार देण्यात आला. १० डिसेंबर २०२१ ते ६ मार्च २०२४ या कालावधीत ती छळमालिका चालली. याप्रकरणी, पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ६ मार्च रोजी आरोपी प्रज्वल बापूराव पाखरे (२६, रा. चौसाळा, ता. अंजनगाव सुर्जी) याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी यांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. तो विषय दोघांच्याही घरापर्यंत पोहोचला. त्यानंतर आरोपीचे आई -वडील व नातेवाईक हे फिर्यादी मुलीकडे लग्नाची मागणी घालायला गेले. सोयरिक पक्की होऊन दोघांचे लग्न ठरले. त्यानंतर दोघांमध्ये मोबाइल संवाद सुरू झाला. सोशल मीडियावरदेखील ते बोलू लागले. आरोपी हा नेहमी शारीरिक संबंधांची मागणी करत होता. मात्र, तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. फोनवर बोलत असतानादेखील तो त्याच विषयाने बोलत राहायचा. आता आपले लग्न ठरले आहे. त्यानंतरच ती बाब योग्य ठरेल, असे तरुणीने त्याला बजावले.
रूम बुक करून अतिप्रसंग
तरुणीचे काहीएक ऐकून न घेता आरोपी प्रज्वलने अमरावती शहरातील फ्रेजरपुरा हद्दीतील एका ठिकाणी रूम बुक करून फिर्यादीसोबत बरेचदा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला. तरुणीने कुठेही तक्रार वा घडलेल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणी व तिच्या आईला धमकावून खोटा आपसी समझोता लेखी लिहून घेतला. मात्र, त्यानंतरही त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने ६ मार्च रोजी पोलिस ठाणे गाठले.