अचलपूर तालुक्यात बनावट बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:54 PM2019-06-28T22:54:44+5:302019-06-28T22:55:38+5:30
अचलपूर तालुक्यात बनावट व विनापरवाना बियाणांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत बनावट बियाणे जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यात बनावट व विनापरवाना बियाणांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. गुप्त माहितीच्या आधारे कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत बनावट बियाणे जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
श्यामलाल बजरंगलाल अग्रवाल (रा.कांडली) आणि राजू नारायणदास अग्रवाल (रा. रामनगर कांडली) असे विनापरवाना व बनावट बियाणे विक्री करणाºया दुकानदारांची नावे आहेत. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव यांनी तक्रार नोंदविली. सातव यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणवत्ता निरीक्षक राम देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दुकानाची तपासणी करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना बियाणे विक्री होत असल्याचे आढळून आले. यासंदर्भात परतवाडा पोलिसात फिर्याद दाखल करून दोन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही दुकानदार विनापरवाना बियाणे विकत असताना त्यांनी हे बियाणे आणले कोठून, या दिशेने पोलिसांनी तपास चालविला आहे. भरारी पथकातील कृषी सहायक रोहित गावंडे, सतीश मोकडे, अशोक सोळंके, कृषी अधिकारी राजू देशमुख, पंच नागेश हिरुळकर, सागर मावळे यांनीही या कारवाईत सहभाग दर्शविला.
जुळ्या शहरासह ग्रामीण भागात विक्री
परतवाडा शहरालगत मेळघाटचा परिसर आहे. त्यामुळे परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विनापरवाना बियाण्यांची विक्री केली जात असल्याचे या घटनेने उघडकीस आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने त्यांची तपासणी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.