अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत प्राथमिक शाळा, नर्सिंग कॉलेज, खासगी इंग्रजी शाळांचे लिपिक, शिपाई, कारकून, प्रयोगशाळा परिचर अशा अपात्र लोकांनी बनावट मतदान केल्याचा आरोप शेखर भोयर यांनी शनिवारी केला. या सर्वांच्या विरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीतील उमेदवार व शिक्षक महासंघाचे शेखर भोयर तसेच महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. बनावट मतदारांवर शेखर भोयर यांनी आक्षेप नोंदविला असतानाही याकडे निवडणूक विभागाने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची व बोगस मतदार बनविण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी भोयरसह अन्य पराभूत उमेदवारांनी आयोगाकडे केली आहे.
बॉक्स
नऊ हजारांवर मतदार बनावट
याद्यांमध्ये संस्थाचालकांचे नावदेखील मतदार म्हणून प्रसिद्ध करण्यात आल्याचा गंभीर प्रकार भोयर यांनी उघडकीस आणला आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात जवळपास तीन हजार मतदार बनावट आहेत. विभागात हा आकडा नऊ हजारांपर्यंत आहे. एकूण मतदारसंख्या पाहता, २५ टक्क्यांहून अधिक मतदार हे बनावट असल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केला.
कोट
आयोगाकडून मतदार यादीबाबत पात्रतेच्या सूचना असतानाही बनावट मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. मुख्याध्यापकांनी बोगस मतदारांचे अर्ज प्रमाणित करून दिल्याने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे.
- शेखर भोयर, अध्यक्ष, शिक्षक महासंघ