शेती वहितीवरून शेतमालक महिलेला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:02 AM2021-06-12T04:02:13+5:302021-06-12T04:02:13+5:30
पोलीस सूत्रांनुसार, आरोपीचे नाव प्रणव सुरेश कडू (३६ रा. घोराड) असे आहे. घोराड येथील शेतकरी महिलेचे घोराड शिवारात शेत ...
पोलीस सूत्रांनुसार, आरोपीचे नाव प्रणव सुरेश कडू (३६ रा. घोराड) असे आहे. घोराड येथील शेतकरी महिलेचे घोराड शिवारात शेत गट क्रमांक २२२ व २२४ मध्ये स्वतःच्या मालकीची व ताब्यातील चार एकर शेतजमीन आहे. गेल्या सहा वर्षांपासून सदर शेतजमीन येथीलच प्रणव कडू याला १० हजार रुपये एकरप्रमाणे ठेका (वहिती) ने दिली आहे. परंतु, गतवर्षीची ठेक्याची रक्कम ३० हजार रुपये वारंवार मागूनसुद्धा दिले नसल्याने यावर्षीपासून स्वतः शेती करण्याचे ठरविले होते. परंतु, चार-पाच दिवसांपूर्वी वहितदार कडू याने त्याच्या शेतीसह फिर्यादीच्या शेतातसुद्धा वखरणी केल्याची माहिती मिळाली होती. यावरून फिर्यादी मुलगी आणि तिची आई मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता शेतात गेली तेव्हा शेत वखरल्याचे दिसले. यावेळी प्रणव कडू याने शेतात येऊन, तुम्ही शेतात कशा काय आल्या, तुम्हाला वावरात यायचा अधिकार आहे काय, अशी विचारणा केली. यावर फिर्यादी महिलेने आमचे शेत आहे, आम्ही कधीही येऊ. तुझ्या नावाने शेत आहे काय, असे म्हटले. त्यावर त्याने शेतातच दोघींनाही पेटविण्याची धमकी देऊन धक्काबुक्की केली आणि खाली पाडले. मुलगी आणि आई उठून उभी झाल्यावर काठीने हातावर, डोक्यावर मारहाण केली आणि खाली पाडले. फिर्यादीच्या छातीवर बसून पुन्हा मारहाण केली. यावेळी फिर्यादी मुलगी आई मध्ये आली असता, तिलाही मारहाण केली. आजूबाजूच्या शेतात कुणीही नसल्याने फिर्यादीच्या चुलतभावाने येऊन जखमी माय-लेकींना ऑटोरिक्षामध्ये वरूड पोलीस ठाण्यात आणले. वहितदार प्रणव कडू याच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून वरूड पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३२४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस वैशाली सरवटकरसह वरूड पोलीस करीत आहे.