गजानन मोहोड
अमरावती : यंदाच्या खरीपातील शेतकऱ्यांचे सोयाबीन या आठवड्यात बाजारात येताच १० हजार रुपये क्विंटलपर्यत गेलेला सोयाबीनचा भाव आता तब्बल सहा हजारांनी घसरलेला आहे. व्यापाऱ्यांनीच षडयंत्र करून भाव पाडल्याचा आरोप शेतकरी वर्गात होत आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी बाजू सावरत सोयाबीन ढेपेच्या आयातीस केंद्र शासनाने दिलेली परवानगी सोबतच नव्या सोयानीनमध्ये २५ टक्क्यांवर माईश्चरचे प्रमाण आदी कारणांमुळे दरात घसरण झाल्याचे सांगितले.
यंदाच्या खरीपामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र आहे. नगदीचे पीक या अर्थाने सोयाबीनचे पिकाकडे पाहिल्या जाते व यानंतर या क्षेत्रात हरभरा किंवा गव्हाचे पीक घेतले जाते. अलिकडे बियाणे दरवाढीसोबत व खते तसेच इंधन दरवाढीमूळे पेरणी व मशागतीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सोयाबीनने गाठलेला १० हजार रुपयांवर दर, यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आठवडाभरापासून दरात सातत्याने घसरण होत असल्याने यंदाही उत्पादनखर्च पदरी पडणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४,००० ते ४,३०० रुपये क्विंटलचे दरम्यान भाव मिळत आहे.
यापूर्वी मे महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने ‘एनसीडीएक्स’वर सोयाबीनचे भावात तेजी आलेली होती. सोयाबीनच्या डीओसीलाही चांगलीच मागणी वाढली होती. याशिवाय प्लॅाटधारकांकडूनही मागणी वाढल्याने सोयाबीनने दहा हजारांचा पल्ला पार केला होता. मात्र, शेतकऱ्यांजवळ माल नसल्याने याचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच झाला होता. त्याचवेळी सोयाबीनच्या तेलाचे भाव १७० रुपये लिटरवर पोहोचले होते. आता चार हजारांवर सोयाबीन आलेले असताना तेलाचे भावात देखील कमी आलेली नाही. एकंदरीत धोरणात सर्वच स्तरावर शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. आता नुकतेच सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यामुळे दरातली घसरण रोखण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे.
बॉक्स
सोयाबीनचे भावात झालेली घसरण(रुपये)
दिनांक कमीतकमी अधिकतम
३ ऑगस्ट ९,२०० १०,२५१
१६ सप्टेंबर ६,५०० ७,५००
१७ सप्टेंबर ६,००० ७,५००
१८ सप्टेंबर ६,५०० ८,०००
२० सप्टेंबर ४,००० ५,५००
२१ सप्टेंबर ४,५०० ५,७००
२२ सप्टेंबर ४,००० ५,२३३