संत्र्याची झाडे तोडून मरणाचे रचणार सरण; मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 03:20 PM2022-12-05T15:20:27+5:302022-12-05T15:29:48+5:30

महावितरणच्या कारभाराला कंटाळले शेतकरी

Farmers suffer due to interrupted power supply of Mahavitaran; wrote Letter to the CM | संत्र्याची झाडे तोडून मरणाचे रचणार सरण; मुख्यमंत्र्यांना निवेदन

संत्र्याची झाडे तोडून मरणाचे रचणार सरण; मुख्यमंत्र्यांना निवेदन

googlenewsNext

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले आहेत. यातच सहायक अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त जवळापूर येथील शेतकरी गणराज कडू यांनी शेतातील संत्रा झाडे तोडून त्यावर शेतातच मरणाचे सरण रचणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना दिला आहे.

महावितरण कंपनीची स्थानिक यंत्रणा शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. दिलेल्या तक्रारींची दखल वेळेत ते घेत नाहीत. यात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यादरम्यान वीज वितरण कंपनीच्या कारभाराने त्रस्त गणराज कडू हे ७ डिसेंबरला आपल्या शेतीतील ४०० संत्रा झाडे तोडणार आहेत. या अनुषंगाने गणराज कडू यांनी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर लेखी निवेदन पाठविले. लाइन सुरू असतानाही दिलेल्या दिवसाला वीज मिळत नाही. २०१७ पासून वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. पिकाला पाणी वेळेवर मिळत नाही. यासंबंधी तक्रारीही दिल्यात, निवेदने दिलीत. सूचनावजा विनंतीही केली, पण त्याची दखल अधिकारी घेत नाहीत.

एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी आणि निवेदन महावितरणच्या संबंधित स्थानिक कार्यालयातून गहाळ केल्या जातात. शेतकऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजना न करता, आवश्यक डीबी न देता मनात येईल त्याप्रमाणे स्थानिक यंत्रणा काम करीत आहेत. यात शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गणराज कडू यांनी नमूद केले आहे.

सहायक अभियंता राहतील जबाबदार

पथ्रोट येथील सहायक अभियंत्यावर शेतकऱ्यांचा रोष आहे. संत्रा झाडे तोडून मरणाचे सरण रचताना होणाऱ्या नुकसानास हे सहायक अभियंताच जबाबदार राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात गणराज कडू यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

गणराज कडू यांच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. अधीक्षक अभियंत्यांसह मुख्य अभियंत्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे पत्र वरिष्ठांना प्राप्त झाले असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

Web Title: Farmers suffer due to interrupted power supply of Mahavitaran; wrote Letter to the CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.