छत्री तलावातील गाळ पोहोचला शेतकऱ्यांच्या दारी
By admin | Published: June 14, 2015 12:19 AM2015-06-14T00:19:38+5:302015-06-14T00:19:38+5:30
शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून..
युवा स्वाभिमानचा पुढाकार : पाणी पातळीत वाढ
अमरावती : शहराचे वैभव असलेल्या ब्रिटिशकालीन छत्रीतलावात अनेक वर्षांपासून साचलेला जवळपास २२०० ट्रक गाळ काढून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
शहरातील एक प्रमुख पिकनिक स्पॉट म्हणून विकसित झालेल्या छत्री तलावातील गाळ अनेक वर्षांपासून काढण्यात न आल्याने या तलावाची पाणी पातळी कमी होत चालली होती. छत्री तलावाचे संवर्धन करण्यासाठी या तलावातील गाळ काढून तो शेतकरी, कुंभार व वीटभट्टी धारकांपर्यंत पोहोचविण्यात आला. गाळ काढल्यामुळे छत्री तलावाची पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचप्रमाणे डोळ्यात समावेल एवढा तलावाचा घेर दिसू लागला आहे. शिवाय निघालेल्या गाळाचा लाभ शेतकऱ्यांना, वीटभट्टीधारकांना देण्यात आला आहे.
आ. रवी राणा यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासमवेत छत्री तलाव परिसराची पाहणी केली. विकासाच्या पुढच्या टप्प्यात छत्री तलावला मुंबईच्या चौपाटीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असून यासाठी योजना आखल्या जातील, असे आयुक्त गुडेवार यांनी स्पष्ट केले.
छत्री तलाव हे अमरावती शहराचे भूषण आहे. अनेक लोक लहान मुलांना घेऊन छत्री तलाव परिसरात मनोरंजनासाठी येतात. त्यामुळे या तलावाचे संवर्धन करण्याची गरज ओळखून या तलावातील गाळ व कचरा स्वच्छ करण्यात आला. यापुढे छत्री तलावाचा संपूर्ण कायापालट करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त चंंद्रकांत गुडेवार यांनी दिले. आ. रवी राणा यांनी छत्री तलाव परिसरात मुंबई येथील चौपाटीच्या धर्तीवर नाना-नानी पार्क बनविण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेसाठी संपूूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन गुडेवार यांनी दिले. यावेळी विनोद जायसवाल, शैलेंद्र कस्तुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)