परतवाडा (अमरावती) : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे चिखलदरा येथील पोलीस विश्रामगृहाच्या उद्घाटनाचा सामना अजूनच रंगला आहे.
महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ व २७४ अन्वये विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव आ. पटेल यांनी दाखल केला. चिखलदरा येथे पोलीस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाच्या नूतन इमारतीच्या २७ जूनच्या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक आमदार असूनही निमंत्रित केले नाही. सदर बाबतीत माझ्या विशेषाधिकाराचा हक्कभंग झाला आहे. या प्रकारास जबाबदार असलेले पोलीस अधीक्षकांविरुद्ध मी याद्वारे हक्कभंग सूचना देत असल्याचे पत्रात त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आ. राजकुमार पटेल यांना हेतुपुरस्सर डावलल्याचा आरोप करीत धारणी, चिखलदरा व परतवाडा येथे प्रहार कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन दिले. चिखलदऱ्यात विनोद लांजेवार, मोग्या बेठेकर, रावजी मावस्कर, परसराम बेठे, शिवदास बडोदे, मंगल कासदेकर, हिराजी कासदेकर, सुनील उईके, बबलू पिपरदे, गुरुदेव भलावी, सुरेश बेलसरे मारुती गायन, फिरोज खान, जफर पठाण, परसराम गाठे, परतवाडा येथे अंकुश भिडकर, संजय उगले, गंगा धडारे, गणेश सोनवणे, शेख साजिद, सतीश पळसपगार, अभिश वानखडे, सुलतान पटेल, आशिष काळे, धारणी येथे प्रकाश घाडगे, श्रीपाल पाल, विनोद वानखडे, सचिन पटेल, उपसभापती जगदीश हेकडे, शैलेश मालवीय, रोहित पटेल, अशोक ठाकूर, विशाल कारवे, बंटी ठाकूर, वाहीद खान, सुमीत चौतमाल, ऋषभ घाडगे, कमल ठाकूर आदी सहभागी झाले.