परतवाडा : बनावट दस्तावेज तयार करून त्या माध्यमातून पूर्णवेळ शिक्षक म्हणून नौकरीस लागणाऱ्यासह त्याला सहकार्य करणाऱ्यांविरूद्ध अचलपूर पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर शरद विसाळे यांच्या आदेशाने सहायक लेखाधिकारी नितीन दांडगे यांनी याबाबत १० डिसेंबर रोजी दुपारी तक्रार नोंदविली.
दी पब्लिक वेल्फेअर सोसायटी अचलपूरचा सचिव अनिलकुमार मदनगोपाल चौधरी (५१, अचलपूर) राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान व व्यावसायिक महाविद्यालय अचलपूरचे प्राचार्य तथा संस्थेचा सहसचिव प्रमोद सुखदेवराव नैकेले (५०, रा. अचलपूर), शिवाजी संतोषराव गोहत्रे (रा. कोळविहीर) व संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून खोटा, बनावटी दस्तावेज (अनुभव प्रमाणपत्र) तयार केले. त्या बनावटी प्रमाणपत्रांचा राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान व व्यावसायिक महाविद्यालय अचलपूर येथे पूर्णवेळ शिक्षक (इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी) या पदावर नोकरी लागण्यासाठी व लावण्यासाठी उपयोग करून शासनाची दिशाभूल केली.
दोन वर्षांतील कारनामा
राष्ट्रीय विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान व व्यावसायिक महाविद्यालय अचलपूर येथे २१ जानेवारी २०१९ ते १० डिसेंबर २०२० पर्यंत संस्था सचिव, प्राचार्य व संस्था पदाधिकाऱ्यांनी शिवाजी संतोष गोहत्रे याला शाळेत नोकरी दिली. त्यात बनावट कागदपत्रांचा समावेश असतानाही नोकरी दिल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या लक्षात आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
कोट
राष्ट्रीय हायस्कूलमध्ये एकाला बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकाची नोकरी दिल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाले. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
- सेवानंद वानखडे,
ठाणेदार, अचलपूर