वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरा अन्यथा खुर्ची बाहेर काढू
By admin | Published: August 17, 2016 12:03 AM2016-08-17T00:03:08+5:302016-08-17T00:03:08+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यात्यारित येणाऱ्या चांदूरबाजार तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारीची पदे रिक्त आहेत.
इशारा : खासदार, जिल्हाधिकाऱ्यांना अल्टिमेटम
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अख्यात्यारित येणाऱ्या चांदूरबाजार तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारीची पदे रिक्त आहेत. यामुळे गोरगरीब रूग्णांची गैरसोय होत आहे. ही जनहिताची मागणी लक्षात घेता तातडीने हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी केली आहे. यावर दहा दिवसांत प्रशासनाने निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढण्याचा इशारा खासदार व जिल्हाधिकारी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
चांदूरबाजार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हिरूळपूर्णा, राजना, आणि आसेगाव पूर्णा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. तसेच या ठिकाणी साठवून ठेवलेली औषधे कालबाह्य झाली आहेत. परिणामी हिरूळपूर्णा येथील एका हुशार मुलीचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुदैवी मृत्यू झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग मात्र डोळेझाक करीत असल्याने ही बाब अतिशय खेदजनक असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निदर्शनास आणून दिलीे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने रिक्त असलेली आरोग्य अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरावीत आणि औषध साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. याबाबत येत्या दहा दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा अधिकाऱ्यांची खुर्ची बाहेर काढण्याचा इशारा निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे.
यावेळी झेडपीच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सुभाष वैराळे, मोहन दवे, कदीर खॉ पठाण, चरण सदार, शिवपाल चपरिया, अरूण वाघमारे, गजानन कावरे, शामकुमार रंधे, उमेश काटोलकर, जावेद पठाण, विठ्ठल वैराडे, सुधाकर वैराडे, राजेश सदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)