जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : विशेष ग्रामसभेत घेणार ठराव, २ जून रोजी मतदान प्रक्रियालोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव / दर्यापूर: गाडगेबाबांच्या जन्मभूमीपासून काही अंतरावरच असलेल्या कोकर्डा येथील देशी दारू दुकान बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून हे दुकान बुधवारी सायंकाळी सील करण्यात आले. कोकर्डा येथील दारू दुकान बंद करण्यात यावी या मागणीसाठी शेंडगाव व कोकर्डासह या परिसरातील महिलांनी ‘करो या मरो’चा नारा देत आंदोलन छेडले होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी दारू दुकानाला ताळे लावले. हे दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी कोकर्डा ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा घेऊन दारुबंदीचा ठराव व २ जून रोजी मतदान घेण्यात यावे अशाही सूचना देण्यात आल्या आहे. तूर्तास ३ जूनपर्यंत दारू दुकान बंद राहणार आहे. दुकान बंद करतेवेळी अंजनगावचे गट विकास अधिकारी भास्कर रेगंडे उपस्थित होते.आंदोलन सुरू झाल्याच्या दिवसांपासुन कोकर्डा येथील दारू दुकान बंद होते. मात्र हे दुकान कायमस्वरुपी बंद व्हावे अशी मागणी केली होती. कोकर्डापासून एक किमी अंतरावर संत गाडगे बाबा यांची जन्मस्थळी आहे. गाडगे बांबाच्या नावाने शासन वेगवेगळे अभियान राबवित असताना त्याच्या गावात दारूबंदी करू शकत नाही का? असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, बुधवारी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही दारू दुकान बंद होते. तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. आंदोलनाबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अखेर कोकर्ड्यातील ‘ते’ दारूदुकान सील
By admin | Published: May 25, 2017 12:06 AM