लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंदचा बुधवारी तिसरा दिवस होता. या कालावधीत अमरावतीकर पाण्यासाठी अग्निपरीक्षाच देत आहेत. पाण्यासाठी गरीब असो मध्यमवर्गीय, एवढेच नव्हेतर श्रीमंतांनाही रस्त्यावर उतरून पाण्याची सोय करावी लागली आहे. विहिरीत उतरून मशीन दुरुस्ती करताना अनेकांनी जीव धोक्यात टाकले.तीन दिवसांत विहिरी, बोअरवेल व हापशींवर पाण्यासाठी अमरावतीकरांची मदार आहे. मात्र, हे स्रोत काही ठिकाणीच उपलब्ध आहेत. त्यामुळे मजीप्रा प्रशासनाच्या अनियोजित, बेताल कारभाराचा फटका बहुतांश अमरावतीकरांना सोसावा लागत आहे. टाकीतील पाणी नळ येईपर्यंत संपायला नको, याची धास्ती त्यांना लागली आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत पाइप लाइन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने गुरुवारी काही भागातील पाणी पुरवठा सुरू होण्याचे संकेत मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना दरदिवसाला १२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मजीप्राकडून केला जातो. मात्र, सिंभोरा धरणावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइप लाइन फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. तत्पूर्वी, रविवारी वादळी पावसाने वृक्ष कोसळून विद्युत तारे तुटल्याने सिंभोरा धरणावरील पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. मजीप्रा प्रशासनाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अन्य यंत्रणा नसल्याने अमरावतीकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर अचानक मंगळवारी मुख्य जलवाहिनी फुटली आणि पुन्हा पाणीपुरवठा बंद होऊन अमरावतीकरांसमोर पाणी संकट उभे ठाकले. आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा, पाइप लाइन फुटणे, त्यातच विज पुरवठा खंडित होणे आदी कारणे मजीप्रा प्रशासनाला लक्ष्य ठरवीत आहेत. अमरावतीत शहरातील आठ लाखांवर लोकसंख्येपैकी बहुतांश मजीप्राच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. मात्र, पाणीपुरवठ्याबाबत मजीप्रा प्रशासनाने आजपर्यंत गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे त्याचा फटका अमरावतीकरांना वारंवार बसला आहे.मजीप्राच्या कारभाराला अमरावतीकर अक्षरश: वैतागले आहेत. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. बादल्या, गुंड व ड्रम घेऊन प्रत्येकाची पाण्यासाठी धाव असल्याचे चित्र शहरात दिसले. हापशी व बोअरवेलवर पाण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. यादरम्यान पाण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांची वाद सुद्धा झालेत. पाणीपुरवठ्याच्या स्थितीत कधी सुधारणा होईल, याचीच प्रतीक्षा आता अमरावतीकरांना आहे.सुदैवाने तो बचावलापाणीपुरवठा बंद झाल्यामुळे अनेकांनी विहिरीवरील मशीनचा वापर केला. मात्र, अनेकांच्या विहिरीवरील मशीन नादुरुस्त असल्यामुळे पाणी मिळविता आले नाही. नागरिकांनी मशीन दुरुस्तीची प्रयत्न सुरु केले होते. मशीनमधून पाणी येत नसल्यामुळे काही नागरिक विहिरीत उतरले. अजय अंबादास बोधनकर (३०, रा. व्यंकैय्यापुरा) यांनी पाणी मिळविण्यासाठी विहिरीवर मशीन लावत होते. दरम्यान, त्यांना विद्युत प्रवाहाचा जोरदार झटका बसल्याने ते जखमी झाले. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने अजय बोधनकर यांचा जीव वाचला, अन्यथा पाण्यासाठी त्या व्यक्तीला जीव गमावावा लागला असता.जीपीएस यंत्रणेचा उपयोग काय?जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी उत्कृष्ट योजना म्हणून गौरविले आहे. मुख्य जलवाहिनीसह शहरातील जलवाहिन्या या जीपीएस यंत्रणेशी जोडल्या आहेत. तथापि, जलवाहिन्या सातत्याने फुटत असताना जीपीएस यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कॅनच्या पाण्याची मागणी वाढलीपाणीटंचाईमुळे कॅनच्या पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. मजीप्राचे शुद्ध पाणी मिळत नसल्याने अनेकांनी कॅनचे पाणी खरेदी केले. काही ठिकाणी तर या पाण्याचेही दर वधारल्याचे दिसून आले. कॅनमधील थंड व शुद्ध पाण्यावर अनेक जण तहान भागवत आहेत.जुनी पीएससीची पाइप लाइन कालबाह्य झाली आहे. तडा गेलेल्या पाइप लाइनला पाण्याच्या प्रेशरने मोठी गळती सुरू झाली. दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असून, चाचणी घेतली जात आहे. जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचल्यानंतर काही भागात पाण्याचा पुरवठा होऊ शकतो.- किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा
पाण्यासाठी अग्निपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 10:28 PM
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंदचा बुधवारी तिसरा दिवस होता. या कालावधीत अमरावतीकर पाण्यासाठी अग्निपरीक्षाच देत आहेत. पाण्यासाठी गरीब असो मध्यमवर्गीय, एवढेच नव्हेतर श्रीमंतांनाही रस्त्यावर उतरून पाण्याची सोय करावी लागली आहे. विहिरीत उतरून मशीन दुरुस्ती करताना अनेकांनी जीव धोक्यात टाकले.
ठळक मुद्देविहिरी, बोअरवेल हातपंपांवर मदार