अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये उन्हाळी २०१९ परीक्षांना १ एप्रिलपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांना वेळीच रोल नंबर (आयडी) मिळाले नाही. त्यामुळे रोल नंबर शोधण्यासाठी धावाधाव झाली. पहिल्याच दिवशी परीक्षेचे नियोजन चुकल्याने विद्यापीठ प्रशासन परीक्षेत ‘फेल’ झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
हिवाळी २०१८ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच सोमवारपासून विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यांतील ३८२ महाविद्यालयांमध्ये उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. सोमवारी इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला अकोला, अमरावती जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना आयडी वेळेत मिळाले नाही. विद्यापीठाकडून महविद्यालयांना रोल नंबर उशिरा पाठविल्याने परीक्षांचे नियोजन ढासळले. इंग्रजी विषयाकरिता सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असते. आयडीअभावी उशिरा पेपर सोडविण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर ओढवली आहे.
परीक्षा अर्ज स्वीकारण्याच्या तारीखेत वाढ करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांकडून ते उशिरा प्राप्त झाले. त्यामुळे त्यांना आयडी उशिरा देण्यात आले. मात्र, इंग्रजी विषयाच्या परीक्षेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहिलेले नाही. - राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ