पाच एफआयआर, २१ परवाने निलंबित; गुण नियंत्रण पथकाची कारवाई, २३८० नमुने घेतले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 30, 2023 05:41 PM2023-04-30T17:41:10+5:302023-04-30T17:41:42+5:30
यावर्षीदेखील कारवायांचा झपाटा कायम राहणार आहे.
अमरावती : शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी गठीत गुणनियंत्रण पथकाने बनावट निविष्ठा प्रकरणात वर्षभरात पाच पोलिस केसेस करुन २१ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहे. यावर्षीदेखील कारवायांचा झपाटा कायम राहणार आहे.
यावर्षी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी १४, कृषी अधिकारी पंचायत १४, उपविभागीय स्तरावर ६, जिल्हास्तरावर ६ असे एकूण ४० निरीक्षकांचा यावेळी वॉच राहणार आहे. गतवर्षी बियाण्यांचे १३३७ नमुने घेण्यात आले. यामध्ये ९४ नमुने अप्रमाणित निघाल्याने न्यायालयीन प्रक्रियेसाठी पात्र ठरले. यामध्ये एका प्रकरणात एफआयआर करण्यात आलेला आहे. याशिवाय ४ परवाने निलंबित करण्यात आलेले आहे.
रासायनिक खतांचे ७८७ नमुने घेण्यात आले यामध्ये ८७ नमुने कोर्टकेससाठी पात्र ठरले आहे, यामध्ये तीन प्रकरणात एफायआर व १० परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. याशिवाय कीटकनाशकांचे २५६ नमुने घेण्यात आले. यापैकी १३ नमुने कोर्टकेससाठी पात्र ठरले आहे. तर एका प्रकरणात एफआयआर व सात परवाने निलंबित केल्याचे कृषी विभागाने सांगितले.