साप विंचवाची वाढली भीती
प्यावे लागतात दूषित पाणी
धामणगाव रेल्वे : तालुक्यात अधिक पावसामुळे पाच गावांतील विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद आहे. महावितरणची सेवा कोलमडली आहे. यादरम्यान रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती अधिक वाढली आहे.
तालुक्यातील वाढोणा, घुसळी, कामनापूर, काशीखेड, मलातपूर, महिमापूर या गावांत अधिक पाऊस झाला. यादरम्यान दोन दिवसांपासून कमी-अधिक पावसाची दररोज हजेरी लागत आहे. पाच दिवसांपासून या गावातील वीजपुरवठा खंडित आहे. दिवसभर शेतकरी शेतात काम करतात, मात्र रात्रीला विद्युत पुरवठा राहत नाही. त्यामुळे धान्य दळून आणायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या भागात अनेकांची घरे कच्च्या माती-विटांची असल्याने रात्रीला साप-विंचू निघतात. विद्युत पुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. महावितरणने आता तरी ग्रामीण भागाचा अंत पाहू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन घुसळीकर, सरपंच राजू बांते, उपसरपंच सुभाष डबले, चंद्रशेखर कडू, रवींद्र पणपलिया यांनी महावितरणला निवेदन दिले. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागीय अभियंता यू.के. राठोड यांनी दिले.